- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- स्वातंत्र्यदिनी आरोग्यमंत्र्यांचा गावागावातील समित्यांशी ऑनलाइन संवाद
स्वातंत्र्यदिनी आरोग्यमंत्र्यांचा गावागावातील समित्यांशी ऑनलाइन संवाद
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर स्वातंत्र्यदिनी ग्रामीण आरोग्य समित्यांशी साधणार ऑनलाइन संवाद. १२४ नवीन आरोग्य संस्थांचे एकाच वेळी ऑनलाइन उद्घाटन.
मुंबई: गावपातळी वरील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट, लोकाभिमुख आणि प्रभावी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यंदाच्या स्वातंत्र्यदिनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहेत. राज्यभरातील विविध गावांमधील आरोग्य समित्यांच्या अशासकीय सदस्यांशी ते थेट ऑनलाइन माध्यमातून जनसंवाद साधणार आहेत. आरोग्य व्यवस्थेत नागरिकांचा सहभाग वाढवून शासन, आरोग्य यंत्रणा आणि समाज यांच्यातील भागीदारी अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याच कार्यक्रमा दरम्यान आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते राज्यातील नव्या १२४ आरोग्य संस्थांचे ऑनलाइन उद्घाटनही पार पडणार आहे.
स्वातंत्र्यदिनी दुपारी १:३० वाजता होणाऱ्या या ऑनलाइन संवादामुळे गावा गावातील आरोग्य विषयक प्रश्न, अडचणी, स्थानिक पातळीवरील नाविन्यपूर्ण उपक्रम आणि नागरिकांच्या अपेक्षा थेट राज्य शासनापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. या संवादात ग्राम आरोग्य, स्वच्छता व पोषण समिती, जन आरोग्य समिती, रुग्ण कल्याण समिती आणि एकात्मिक आरोग्य वर्धिनी समितीच्या सदस्यांचा सक्रिय सहभाग असणार आहे. या समित्यांमध्ये ग्रामपंचायत प्रतिनिधी, महिला भगिनी, युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध घटकांचा समावेश असून, ते शासन व नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतात. कार्यक्रमात निवडक पाच समिती सदस्यांना आपले मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळणार असून, त्यानंतर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
या राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी जिल्हा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर व्यापक पूर्वतयारी करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर स्वच्छता व पोषण आणि जन आरोग्य समितीच्या सदस्यांनी आपापल्या नजीकच्या अंगणवाडी केंद्रात किंवा ग्रामपंचायत कार्यालयात एकत्रित जमून या डिजिटल संवादामध्ये सहभागी व्हावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. निवडक सदस्यांशी थेट द्विमार्गी संवाद साधण्यासाठी स्वतंत्र इको लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे, तर इतर सदस्यांसाठी यू-ट्यूब आणि ब्रॉडकास्ट लिंकद्वारे कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखवले जाणार आहे. याशिवाय ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांच्या क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आणि संबंधित मान्यवरही या उपक्रमात मोठ्या संख्येने जोडले जाणार आहेत.
या विशेष कार्यक्रमाचे आणखी एक मोठे आकर्षण म्हणजे राज्यातील विविध भागांत नव्याने उभारण्यात आलेल्या आणि कार्यान्वित झालेल्या १२४ आरोग्य संस्थांचे ऑनलाइन उद्घाटन. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, तालुका सार्वजनिक आरोग्य युनिट तसेच महानगर पालिका क्षेत्रातील शहरी आरोग्य व कल्याण केंद्रांचा समावेश आहे. ग्रामीण भागासोबतच शहरी भागातील नागरिकांना त्यांच्या घराजवळच दर्जेदार आणि उच्चस्तरीय आरोग्य सेवा सुलभतेने उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या धोरणाला या नवीन संस्थांमुळे अधिक बळ मिळणार आहे.
आरोग्य सेवा ही केवळ शासकीय यंत्रणेची जबाबदारी नसून त्यात लोकांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे, ही या उपक्रमा मागील मुख्य भावना आहे. या थेट संवादामुळे तळागाळातील आरोग्य सेवांच्या अंमलबजावणीतील त्रुटी समजून घेणे, अडचणी दूर करणे आणि आरोग्य यंत्रणेला अधिक लोकाभिमुख बनवणे सुलभ होणार असून, निरोगी महाराष्ट्राच्या संकल्पनेला यामुळे एक नवी दिशा मिळण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
