- Hindi News
- पुणे
- पुण्यात बर्गर किंगवर कारवाई; परवाना रद्द
पुण्यात बर्गर किंगवर कारवाई; परवाना रद्द
अन्न सुरक्षा व अस्वच्छतेप्रकरणी पुण्यात कॅम्प परिसरातील बर्गर KING चा परवाना रद्द. नाशिकमध्ये झेप्टो तर मुंबईत पारले ॲग्रोच्या गोदामावर एफडीएची धडक कारवाई.
पुणे: राज्यभरात अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि आरोग्याच्या निकषांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनां विरोधात अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून सुरू असलेल्या धडक कारवायांमुळे अन्न भेसळ करणाऱ्या आणि नियम धाब्यावर बसवणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. याचाच प्रत्यय नुकताच आला असून, पुण्यातील प्रसिद्ध ‘बर्गर किंग’चा परवाना रद्द करण्यात आला आहे, तर मुंबई आणि नाशिकमध्येही गोदामे व ई-कॉमर्स कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
पुण्यातील कॅम्प परिसरातील ‘बर्गर किंग’वर कारवाई
पुण्यातील हजारो खवय्यांच्या पसंतीचे केंद्र असलेल्या कॅम्प परिसरातील ‘बर्गर किंग’च्या आऊटलेटवर एफडीएच्या पथकाने अचानक छापा टाकला. या तपासणी दरम्यान रेस्टॉरंटमध्ये खाद्य पदार्थांच्या स्वच्छतेबाबत आणि आरोग्याच्या नियमांसंदर्भात अत्यंत गंभीर त्रुटी आढळून आल्या. स्वयंपाक घरातील अस्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे थेट उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे प्रशासनाने कठोर पाऊल उचलत या बर्गर किंगचा परवाना तात्काळ रद्द केला आहे. या अचानक झालेल्या कारवाईमुळे पुणेकर खवय्यांमध्ये आणि परिसरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
नाशिकमध्ये ‘झेप्टो’चा परवाना निलंबित
‘सेफ फुड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमे अंतर्गत नाशिक मधील सिडको परिसरातील ‘झेप्टो’ (Zepto) च्या आस्थापनेवरही मोठी कारवाई करण्यात आली आहे. १३ ऑगस्ट रोजी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत येथे स्वच्छता आणि आरोग्यविषयक निकषांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. अन्नसुरक्षा नियमांतील परिशिष्ट-४ चे स्पष्ट उल्लंघन झाल्यामुळे प्रशासनाने या आस्थापनेचा अन्न परवाना निलंबित केला आहे. आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी वैभव गर्दे आणि अमित रासकर यांनी ही कारवाई पार पाडली. सहआयुक्त मंगेश माने आणि सहायक आयुक्त ज्ञानेश्वर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राज्यभर राबवली जात आहे.
मुंबईत ‘पारले अॅग्रो’च्या गोदामावर धाड
या मोहिमेचा एक भाग म्हणून, अन्न व औषध प्रशासनाने गुरुवारी मुंबईतील चेंबूर वाशीनाका परिसरात असलेल्या ‘पारले अॅग्रो’ कंपनीच्या गोदामावर अचानक धाड टाकली. या कारवाईत नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा तब्बल १ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुदत संपलेला (Expired) फ्रूटी, अॅपी फिझ, कोल्ड ड्रिंक्स आणि कॅन्डी ज्यूसचा साठा जप्त करण्यात आला आहे.
तुकाराम मुंडे यांच्या धडक मोहिमेमुळे आता केवळ हॉटेल्स आणि ढाबेच नव्हे, तर बड्या कंपन्या आणि ऑनलाइन डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्सवरही प्रशासनाची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कडक कारवायांमुळे अन्न व पेय पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये शिस्त निर्माण होण्यास मोठी मदत होणार आहे.
