- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- विकासाच्या चौकटीत शेतकरी, युवक, महिला; महाराष्ट्राला महासत्ता बनवण्याचा निर्धार
विकासाच्या चौकटीत शेतकरी, युवक, महिला; महाराष्ट्राला महासत्ता बनवण्याचा निर्धार
स्वातंत्र्यदिनी ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण. १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था, ठाणे अंतर्गत मेट्रो आणि ठाणे-बोरिवली बोगद्यावर भाष्य.
ठाणे: भारताच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा अत्यंत उत्साहात, देशभक्तीमय वातावरणात आणि दिमाखात संपन्न झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या वेळी राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला. सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक, सशक्त महिला आणि आनंदी नागरिक हीच आपल्या विकासाची खरी व्याख्या आहे, असे स्पष्ट करत शेतकऱ्यांचा सन्मान, कामगारांचा घाम, महिलांचा आत्मविश्वास आणि आधुनिक तंत्रज्ञानाची ताकद एकत्र आणून महाराष्ट्र आणि भारताला जगातील सर्वोत्कृष्ट राष्ट्र बनवण्याचा दृढ निर्धार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेळी व्यक्त केला.
या दिमाखदार सोहळ्याला खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, आमदार संजय केळकर, आमदार माधवी नाईक, महापौर शर्मिला पिंपोळकर, उपमहापौर हनुमंत जगदाळे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सोहळ्याच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहली. तसेच देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करत त्यांनी उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
आर्थिक प्रगती आणि शेतकरी कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील १२ वर्षांत भारताने अवकाश संशोधन, डिजिटल तंत्रज्ञान, ऊर्जा स्वावलंबन आणि संरक्षण क्षेत्रात घेतलेली गगनभरारी ऐतिहासिक असल्याचे नमूद करत उपमुख्यमंत्री म्हणाले की, ‘ब्रह्मोस’सारख्या तंत्रज्ञानामुळे देश संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर झाला आहे. याच राष्ट्रीय प्रवाहात महाराष्ट्र राज्य १ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. बळीराजाच्या कल्याणाचा पुनरुच्चार करताना त्यांनी सांगितले की, राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकऱ्यांचा असून शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ लागू केली आहे. ठाणे जिल्ह्यातील ९७ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅक प्रणालीवर नोंदणी केली असून, जिल्हा परिषद सेस फंडातून २,१०० लाभार्थ्यांना आधुनिक शेती साहित्य, सिंचन साधने आणि महिला बचतगटांना ई-कार्टचे वाटप करण्यात आले आहे. तसेच ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’च्या माध्यमातून हजारो नागरिकांना थेट लाभ आणि शासकीय नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.
ठाण्याच्या विकासाचे गेमचेंजर प्रकल्प
ठाणे जिल्ह्याच्या विकासाचा नवा अध्याय मांडताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ठाणे अंतर्गत मेट्रो आणि ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा हे दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्प शहरासाठी गेमचेंजर ठरणार आहेत. ठाण्याच्या बाजूने दुसऱ्या बोगद्याचे कामही वेगाने सुरू झाले आहे. ठाणे शहरासाठी ३०२ कोटींचा तर अंबरनाथ साठी १५० कोटी रुपयांचा मलनिःसारण प्रकल्प मंजूर झाला असून, गोरगरीब व मध्यम वर्गीयांना पक्की घरे देत संपूर्ण महाराष्ट्र झोपडपट्टीमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प आहे. तसेच ठाण्यातील ९०० खाटांचे राज्यातील सर्वात मोठे अत्याधुनिक सिव्हिल हॉस्पिटल याच वर्षात सेवेत दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सुरक्षा, तंत्रज्ञान आणि युवा शक्ती
नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ६ हजार ५९ कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सक्षम कॅमेरे बसवले जात आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘आधारवड’ ॲप आणि संवाद वाढवण्यासाठी ‘पोलीस मित्र’ ॲप कार्यान्वित करण्यात आले आहे. नशामुक्त भारत अभियानांतर्गत ठाणे पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ नष्ट करून गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली आहे. आजची तरुण पिढी ही अत्यंत स्मार्ट, टेक्नो-सॅव्ही आणि इनोव्हेशन करणारी असून त्यांनी स्टार्टअप्स आणि ग्रीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकासात सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
जलसंधारण आणि महिला सक्षमीकरणावर भर
कार्यक्रमा दरम्यान मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ आणि ‘मृद व जलसंधारण रील्स स्पर्धे’ च्या अधिकृत लोगोचे अनावरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जिल्हा माहिती कार्यालय आणि ‘द ग्लोबल टाइम्स’च्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या महिला सक्षमीकरण व यशकथांवरील ‘स्त्री दर्पण’ या ई-बुकचे प्रकाशन करण्यात आले. सोहळ्याच्या शेवटी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
