- Hindi News
- पुणे
- ८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पोलिस मुख्यालयासाठी जमीन मंजूर
८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पोलिस मुख्यालयासाठी जमीन मंजूर
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी ताथवडे येथे ५० एकर जमीन मंजूर. ८ वर्षांनंतर पोलिसांची भाड्याच्या जागेतून सुटका, अत्याधुनिक संकुल उभारणार.
पिंपरी: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी स्वतंत्र आणि हक्काची पायाभूत सुविधा उभारण्याच्या दृष्टीने एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश आले असून, पिंपरी-चिंचवड पोलीस मुख्यालयासाठी शासनाकडून तब्बल ५० एकर (२० हेक्टर) जमीन अधिकृतपणे मंजूर करण्यात आली आहे. मावळ-मुळशी तालुक्यातील ताथवडे येथील ‘वाळुंजमाता क्षेत्र’ अंतर्गत पशुसंवर्धन विभागाच्या अखत्यारीत असलेली ही विस्तीर्ण जागा पोलीस मुख्यालय, परेड ग्राऊंड आणि इतर अत्यावश्यक सुविधांसाठी हस्तांतरित करण्यास महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली असून, १३ ऑगस्ट रोजी ही जमीन अधिकृतपणे पिंपरी-चिंचवड पोलीस दलाच्या स्वाधीन करण्यात आली आहे.
उल्लेखनीय आहे की, २८ मे २०१८ रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाली होती आणि १५ ऑगस्ट २०१८ पासून प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली होती. मात्र, स्वतःची हक्काची इमारत आणि परिसर नसल्यामुळे गेल्या आठ वर्षांपासून संपूर्ण आयुक्तालय भाड्याच्या जागेतूनच आपले कामकाज चालवत होते. हा प्रश्न सोडवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी पदभार स्वीकारल्या पासूनच विशेष प्राधान्य दिले होते. महसूल व वन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय (पुणे) आणि पशुसंवर्धन विभाग यांच्याशी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी समन्वय साधून ताथवडे येथील दळणवळणाच्या व प्रशासकीय दृष्टीने उपयुक्त जागेसाठी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर महसूल विभागाच्या मंजुरीनंतर पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये १३ ऑगस्ट रोजी ही ५० एकर जमीन पोलीस प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आली आहे.
मिळालेल्या या विस्तीर्ण जागेवर पिंपरी-चिंचवड पोलिसांसाठी एक अत्याधुनिक आणि सर्व समावेशक संकुल उभारण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) कार्यालयासह शस्त्रागार, द्रुतकृती दल (QRT), बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS), मोटार परिवहन विभाग आणि भव्य परेड ग्राऊंडची निर्मिती केली जाणार आहे. याशिवाय, पोलीस भरतीसाठी स्वतंत्र मैदान, रनिंग ट्रॅक, विविध क्रीडांगणे, इनडोअर शूटिंग रेंज आणि श्वान पथकासाठी आधुनिक सुविधा विकसित करण्याचे नियोजन आहे. पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी दवाखाना, पोलिसांच्या पाल्यांसाठी शाळा, बहुद्देशीय सभागृह तसेच अधिकारी आणि अंमलदारांसाठी हक्काची व अत्याधुनिक निवास व्यवस्थाही या ठिकाणी उभारली जाणार आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे भविष्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या विविध प्रशासकीय, प्रशिक्षण आणि कार्यात्मक गरजा एकाच ठिकाणी सुलभतेने पूर्ण होण्यास मोठी मदत होणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपआयुक्त गणेश इंगळे आणि पोलीस निरीक्षक विकास राऊत यांनी अथक परिश्रम घेत सातत्याने पाठपुरावा केला होता, ज्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला आहे.
