महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वेगवान वाटचाल; फडणवीसांची घोषणा

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा. महाराष्ट्र २०२९-३० पर्यंत १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनणार; 'चौथी मुंबई' अन् ऑफशोर विमानतळाचा प्लॅन.

मुंबई: भारताची वाटचाल आता जागतिक नेतृत्वाच्या दिशेने सुरू असून, महाराष्ट्राचे अर्थकारण लवकरच ‘ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी’चे लक्ष्य गाठेल, असा दृढ विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेल येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य स्वागत समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विविध देशांचे राजनैतिक अधिकारी, वाणिज्यदूत (Consuls), विविध देशांचे प्रतिनिधी आणि राज्यातील प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         या महत्त्वाच्या कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, मंत्री छगन भुजबळ, मंगलप्रभात लोढा, आदिती तटकरे, राज्यमंत्री योगेश कदम, महापौर रितू तावडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

      समारंभाला संबोधित करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारत ही जगातील सर्वात प्राचीन आणि वैविध्यपूर्ण संस्कृतींपैकी एक असून, समावेशकता आणि सहिष्णुता ही आपली मुख्य वैशिष्ट्ये आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आज अधिक सक्षम, आत्मविश्वासपूर्ण आणि जागतिक पटलावर निर्णायक भूमिका बजावणारा देश बनला आहे. आज जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताने आपले स्थान प्रस्थापित केले असून लवकरच आपण पाच ट्रिलियन डॉलर्सपेक्षा मोठ्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मागील एका दशकात गरिबी निर्मूलन, पायाभूत सुविधा, नवकल्पना आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने अभूतपूर्व प्रगती साधली आहे.

      महाराष्ट्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे प्रमुख शक्तिकेंद्र असल्याचे अधोरेखित करत मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य हे देशाचे उत्पादन क्षेत्रातील अग्रणी केंद्र, स्टार्टअप्सची राजधानी आणि गुंतवणुकीचे मुख्य आकर्षण बनले आहे. मुंबई ही केवळ देशाची आर्थिक राजधानी नसून, ती आता जागतिक गुंतवणूक आकर्षित करणारे प्रमुख केंद्र ठरत आहे. मुंबई आणि नवी मुंबईचा परिसर देशाची ‘डेटा सेंटर राजधानी’ म्हणून वेगाने विकसित होत आहे. राज्याच्या सागरी सामर्थ्याला नवी दिशा देण्यासाठी पालघर जिल्ह्यात उभारले जाणारे वाढवण बंदर हे देशातील सर्वात मोठ्या जवाहरलाल नेहरू बंदरापेक्षा (JNPA) तब्बल तीनपट मोठे असणार असून, त्याचा जगातील अव्वल दहा बंदरांमध्ये समावेश होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

        याशिवाय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात साकारत असलेली ‘तिसरी मुंबई’ आता प्रत्यक्षात आकार घेत असून, तिथे एज्युकेशन सिटी, मेडी सिटी, इनोव्हेशन सिटी, स्पोर्ट्स सिटी, जीसीसी सिटी आणि नवे व्यावसायिक जिल्हे उभे राहत आहेत. एवढेच नव्हे तर वाढवण बंदर ते विरार या पट्ट्यात ‘चौथी मुंबई’ विकसित करण्याची संकल्पना असून, पालघर जिल्ह्यात देशातील पहिले ऑफशोर विमानतळ उभारण्याची राज्याची महत्त्वाकांक्षा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुंबई, पुणे व एमएमआर परिसरासोबतच छत्रपती संभाजीनगर, नागपूर, चंद्रपूर, नाशिक आणि अहिल्यानगर ही नवी विकासकेंद्रे म्हणून उदयास येत असून, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा व अत्याधुनिक तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत आहे. महाराष्ट्र हे देशातील पहिले उपराष्ट्रीय ट्रिलियन डॉलर अर्थकारण असलेले राज्य बनण्याच्या मार्गावर असून, २०२९-३० पर्यंत हे ध्येय निश्चितपणे साध्य केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

     याप्रसंगी बोलताना मंत्री जयकुमार रावल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेचा उल्लेख करत, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आर्थिक व औद्योगिक क्षेत्रात अधिक बळकट होत असल्याचे सांगितले. तसेच, कौन्सुलर कॉर्प्सचे डेप्युटी डीन तथा पोलंडचे महावाणिज्य दूत थॉमस यांनी मनोगत व्यक्त करताना भारताने स्वातंत्र्यानंतर केलेली प्रगती जगासाठी प्रेरणादायी असल्याचे म्हटले. राजशिष्टाचार विभागाचे सचिव डॉ. राजेश गवांदे यांनी स्वागत केले, तर महाराष्ट्राच्या प्रगतीचे दर्शन घडवणारी विशेष ध्वनिचित्रफित यावेळी दाखविण्यात आली.

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

राष्ट्रपती मुर्मूंचे देशवासीयांना संबोधन; जागतिक अस्थिरतेतही भारताची अर्थव्यवस्था मजबूत

Latest News

राष्ट्रपती मुर्मूंचे देशवासीयांना संबोधन; जागतिक अस्थिरतेतही भारताची अर्थव्यवस्था मजबूत राष्ट्रपती मुर्मूंचे देशवासीयांना संबोधन; जागतिक अस्थिरतेतही भारताची अर्थव्यवस्था मजबूत
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे देशाला संबोधन. भारताचा विकास दर जागतिक सरासरीच्या दुप्पट, ७८ वीरता पुरस्कारांना मंजुरी.
इस्रो अभ्यास दौरा पूर्ण करून ४१ विद्यार्थी नागपुरात दाखल; पालकमंत्र्यांनी साधला संवाद
शौर्य आणि सेवेला सलाम; महाराष्ट्रातील ८२ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
महाराष्ट्र लोकायुक्तात दोन न्यायिक, दोन बिगर न्यायिक सदस्यांचा शपथविधी
पुण्यात लक्ष्मण हाके-नवनाथ वाघमारे आक्रमक; सरकारच्या भूमिकेवर नाराजी

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software