- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- मुंबई पालिकेच्या कँटीनवर FDA चा दणका! ताकात माशी आढळल्याने कँटीन सील; ठोकला ५० हजारांचा दंड
मुंबई पालिकेच्या कँटीनवर FDA चा दणका! ताकात माशी आढळल्याने कँटीन सील; ठोकला ५० हजारांचा दंड
बीएमसी मुख्यालयातील कँटीनमध्ये ताकात माशी आढळल्याने एफडीएची मोठी कारवाई! कँटीन सील करत 'कमल कॅटरर्स'ला ५० हजारांचा दंड.
मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) मुख्य इमारतीमधील कँटीनमध्ये थेट अन्न व औषध प्रशासनाने (FDA) छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. कँटीनमध्ये एका ग्राहकाला दिलेल्या ताकाच्या ग्लासमध्ये माशी आढळल्याची अत्यंत धक्कादायक बाब उघडकीस आल्यानंतर एफडीएने कठोर पावले उचलली आहेत. या घटनेची तातडीने गंभीर दखल घेत एफडीए अधिकाऱ्यांनी सुमारे पाच तास कँटीनची झाडाझडती घेतली. या तपासात अस्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांची गंभीर पायमल्ली झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे कँटीन सील करून चालकाला काम बंद करण्याची नोटीस (Stop Business Notice) बजावण्यात आली आहे.
अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत झालेल्या या गंभीर निष्काळजीपणाबद्दल पालिका प्रशासनानेही कडक भूमिका घेतली आहे. बीएमसीच्या आरोग्य आणि कामगार विभागाने संबंधित ठेकेदार 'कमल कॅटरर्स'वर ५० हजार रुपयांचा दंडात्मक बडगा उभारला आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आक्रमक नेतृत्वाखाली सध्या संपूर्ण मुंबईसह राज्यभरात खाद्यपदार्थांच्या दर्जाची तपासणी मोहीम तीव्र करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत यापूर्वी केईएम रुग्णालयाचे कँटीन तसेच मुंबईतील प्रसिद्ध 'के. रुस्तम आईस्क्रीम पार्लर'वर अस्वच्छतेच्या कारणावरून कारवाई करण्यात आली होती.
महापालिका मुख्यालयासारख्या मुख्य ठिकाणीच असा निकृष्ट दर्जाचा अन्नपुरवठा होत असल्याचे समोर आल्याने पालिका कर्मचाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या घटनेनंतर महापालिकेने आपल्या सर्व परिसरातील कँटीनमध्ये स्वच्छता आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत अधिक कडक दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. एफडीएचा सविस्तर चौकशी अहवाल समोर आल्यानंतर संबंधित ठेकेदारावर अधिक कडक कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई केली जाईल, असे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
