- Hindi News
- पुणे
- पुण्यात मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यापार! पोलिसांच्या छाप्यात ३ पीडित तरुणींची सुटका
पुण्यात मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यापार! पोलिसांच्या छाप्यात ३ पीडित तरुणींची सुटका
पुण्यातील मगरपट्टा परिसरातील 'द फॉरेव्हर' स्पा सेंटरवर हडपसर पोलिसांची धाड! देहविक्री रॅकेट उघडकीस आणत ३ तरुणींची सुटका, मालकिणीसह मॅनेजरवर गुन्हा.
पुणे: पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात बेकायदेशीर आणि अनैतिक कृत्यांविरोधात पोलिसांनी आपली पकड मजबूत केली आहे. याच धडक मोहिमेचा भाग म्हणून हडपसर पोलिसांनी मगरपट्टा या हायप्रोफाईल भागातील एका स्पा सेंटरवर गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून सुरू असलेल्या देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन पीडित तरुणींची सुटका केली असून स्पा मालकिणीसह मॅनेजरविरोधात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार (PITA) गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मगरपट्टा परिसरातील सिझन्स मॉलसमोरील 'द कॉस्मो पॉलिस' या इमारतीत 'द फॉरेव्हर' नावाचे स्पा सेंटर चालवले जात होते. या ठिकाणी मसाज आणि स्पाच्या नावाखाली गरजू तरुणींना पैशांचे मोठे आमिष दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने देहविक्री करून घेतली जात असल्याची माहिती हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती. माहितीची सत्यता पडताळण्यासाठी पोलिसांनी सुरुवातीला एका बनावट ग्राहकाला तिथे पाठवून खात्री केली. अनैतिक प्रकार सुरू असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांच्या पथकाने अचानक छापा टाकून या रॅकेटचा भांडाफोड केला.
या प्रकरणी पोलीस हवालदार बाबू लोणकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून स्पा मालकीण अश्विनी मुरडे (रा. कल्याणीनगर) आणि मॅनेजर रकबुल अबुल हुसेन यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. आरोपी तरुणींच्या असहायतेचा फायदा घेऊन त्यांना या दलदलीत ढकलत असत आणि त्यातून मिळणाऱ्या कमाईवर स्वतःची उपजीविका भागवत असल्याचे तपासात समोर आले आहे. हडपसर पोलिसांनी केलेल्या या अचानक आणि धडक कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर स्पा चालकांचे धाबे दणाणले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
