- Hindi News
- सातारा
- माण तालुक्यातील शाळा वाऱ्यावर; शिक्षण विभागाच्या भूमिकेवर पालक नाराज
माण तालुक्यातील शाळा वाऱ्यावर; शिक्षण विभागाच्या भूमिकेवर पालक नाराज
साताऱ्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांच्या कारभारावर माण तालुक्यातील पालक नाराज! शाळांची पाहणी न करणे, बेकायदेशीर फी वसुली यावरून आंदोलनाचा इशारा.
दहिवडी : सातारा जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांच्या कार्यपद्धतीवर माण तालुक्यातील पालक आणि नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पदभार स्वीकारल्यापासून शिक्षणाधिकाऱ्यांनी माण तालुक्यातील एकाही शाळेला अचानक भेट देऊन पाहणी करण्याची तसदी घेतली नसल्याने, त्यांना दुष्काळी भागाचा विसर पडला आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. साताऱ्यातील वातानुकूलित (एसी) कार्यालयात बसूनच कारभार हाकला जात असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे आणि शाळांचे प्रश्न पूर्णपणे प्रलंबित राहिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कोणताही धाक उरलेला नसल्यामुळे माण तालुक्यातील अनेक माध्यमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा खालावला आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे यांसारख्या मूलभूत सुविधा मिळतात की नाही, शिक्षक वेळेवर येतात का, याकडे शिक्षण विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. याशिवाय, शासनाकडून लाखो रुपयांचे अनुदान घेणाऱ्या अनेक शाळा विद्यार्थ्यांकडून नियमबाह्य आणि बेकायदेशीर फी उकळत असल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे. गरिबांच्या खिशावर पडणाऱ्या या दरोड्याकडे शिक्षण विभाग हेतुपुरस्सर डोळेझाक करत असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.
माण तालुका दुष्काळी असल्याने तेथील ऊन आणि धुळीचा त्रास टाळण्यासाठीच अधिकारी तालुक्यात येणे टाळत आहेत का, असा संतप्त सवाल स्थानिक पालकांकडून विचारला जात आहे. शिक्षण व्यवस्थेच्या या दुरवस्थेकडे वरिष्ठ प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देऊन संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे. प्रशासनाने यावर लवकरात लवकर ठोस कारवाई न केल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तालुक्यातील पालकांनी दिला आहे.
