- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- "देशमुखांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करा!" नवनाथ बन यांचा अनिल देशमुखांवर अयोग्य वर्तनाचा आरोप
"देशमुखांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करा!" नवनाथ बन यांचा अनिल देशमुखांवर अयोग्य वर्तनाचा आरोप
छत्रपती संभाजीनगरमधील आंदोलनात अनिल देशमुखांचे महिला पोलिसांशी गैरवर्तन? भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी व्हिडिओ शेअर करत केली गुन्हा दाखल करण्याची मागणी.
छत्रपती संभाजीनगर: आंदोलनादरम्यान महिलांशी गैरवर्तन केल्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील एका आंदोलनाचा संदर्भ देत अनिल देशमुख यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्याशी अयोग्य व्यवहार आणि गैरवर्तन केल्याचा ठपका बन यांनी ठेवला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत भाजप प्रवक्त्याने अनिल देशमुखांविरोधात विनयभंगाचा गुन्हा का दाखल केला जाऊ नये, असा सवाल उपस्थित केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी त्यांच्या अधिकृत 'एक्स' (ट्विटर) हँडलवरून हा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान बंदोबस्तावर असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याशी अनिल देशमुख यांनी अयोग्य वर्तन केले, जे या व्हिडिओत स्पष्ट दिसत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. व्हिडिओमधील एका विशिष्ट भागाला वर्तुळ आणि बाण दाखवून हा प्रकार अधोरेखित करण्यात आला आहे. या घटनेवरून विरोधी पक्षातील नेते आमदार रोहित पवार आणि काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्यावर निशाणा साधत भाजप प्रवक्त्याने देशमुखांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी ते करणार का, असा प्रश्न विचारला आहे.
दरम्यान, दिल्लीतील जंतर-मंतर तसेच मुंबईतील आंदोलनादरम्यान पोलिसांनी महिला आंदोलकांशी गैरवर्तन केल्याचे आरोप विरोधकांकडून केले जात असतानाच, भाजपकडून थेट माजी गृहमंत्र्यांवरच हा पलटवार करण्यात आला आहे. विरोधी पक्षाकडून करण्यात आलेले आरोप मुंबई पोलिसांनी आधीच फेटाळून लावले आहेत, मात्र आता भाजपने अनिल देशमुख यांचा व्हिडिओ समोर आणल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गदारोळ निर्माण होण्याची शक्यता आहे. या आरोपांवर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि अनिल देशमुख नक्की काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
