- Hindi News
- देश
- Gujarat Rain Update: वलसाडमध्ये पावसाचा महाहाहाकार! २४ तासांत १०६४ मिमी पावसाची नोंद; शेकडो नागरिक स...
Gujarat Rain Update: वलसाडमध्ये पावसाचा महाहाहाकार! २४ तासांत १०६४ मिमी पावसाची नोंद; शेकडो नागरिक स्थलांतरित
वलसाड जिल्ह्यातील उमरगाम येथे २४ तासांत १०६४ मिमी पावसाची ऐतिहासिक नोंद! पुरामुळे जनजीवन विस्कळीत; एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू.
वलसाड: गुजरातच्या दक्षिण किनारपट्टीवर मुसळधार पावसाने थैमान घातले असून वलसाड जिल्ह्यातील उमरगाम तालुक्यात अवघ्या २४ तासांत १०६४ मिलिमीटर (१०६.४ सेमी) इतक्या प्रचंड पावसाची ऐतिहासिक नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या नोंदींनुसार, गेल्या २० वर्षांतील हा सर्वाधिक, तर संपूर्ण देशाच्या इतिहासातील तिसऱ्या क्रमांकाचा विक्रमी पाऊस ठरला आहे. याआधी २७ जुलै २००५ रोजी मुंबईत ९४४.२ मिमी पावसाची नोंद झाली होती, तो विक्रम उमरगाममधील पावसाने मोडून काढला आहे. या ढगफुटीसदृश पावसाने संपूर्ण उमरगाम आणि आसपासच्या परिसराला जलमय केले असून सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
अचानक झालेल्या या मुसळधार पावसामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून रस्ते आणि रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले असून प्रशासनाकडून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या शेकडो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले असून राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (NDRF) तुकड्यांना तैनात करण्यात आले आहे. पुराचा धोका लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने नागरिकांना घरातच राहण्याचे आणि आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
दक्षिण गुजरात आणि लगतच्या किनारपट्टीवर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा अभूतपूर्व पाऊस झाल्याचे हवामान तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. पावसामुळे जनजीवन पूर्णपणे कोलमडले असून वीज आणि संपर्क यंत्रणा खंडित झाली आहे. प्रशासनाकडून पूरबाधित भागात अन्न आणि पिण्याच्या पाण्याची पाकिटे वाटप केली जात आहेत. पुढील २४ तासांत गुजरातच्या किनारपट्टीवर अतिवृष्टीचा इशारा कायम असल्याने संपूर्ण वलसाड जिल्हा आणि आसपासच्या प्रशासनाला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
