गणेशोत्सवाला जागतिक वारशाचा मान मिळवण्यासाठी शासनाची तयारी

गणेशोत्सवाला युनेस्कोच्या जागतिक अमूर्त वारशाचा दर्जा मिळवून देण्यासाठी राज्य सरकारची तयारी. मूर्तिकारांसाठी वेलिंग-खातू पुरस्कार व 'बेस्ट'च्या विशेष सेवा जाहीर.

मुंबई: महाराष्ट्राचा लाडका आणि सांस्कृतिक अस्मितेचा सोहळा असलेल्या गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला असून, आता या उत्सवाचे वैश्विक आणि अद्वितीय मूल्य जगासमोर आणण्यासाठी शासना कडून व्यापक नियोजन केले जात आहे. पौराणिक, ऐतिहासिक आणि सामाजिक चळवळींची १०० वर्षांहून अधिक गौरवशाली परंपरा असलेल्या या उत्सवाची अभ्यासपूर्ण आणि पद्धतशीर मांडणी करून तो ‘युनेस्को’च्या (UNESCO) जागतिक यादीत नेण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत, अशी महत्त्वाची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली आहे.

        पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे गणेशोत्सवाच्या तयारी बाबत आयोजित दोन वेगवेगळ्या उच्चस्तरीय बैठकांमध्ये ते बोलत होते. पहिल्या बैठकीत सांस्कृतिक कार्य विभाग, सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस व वाहतूक अधिकारी उपस्थित होते, तर दुसऱ्या बैठकीत गणेशोत्सव महासंघ, समन्वय समिती, मूर्तिकार संघटना यांच्यासह महानगरपालिका, रेल्वे, एसटी महामंडळ आणि पोलीस प्रशासनाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. गतवर्षी पर्यंत शासन केवळ परवानग्या देणारी यंत्रणा होती, मात्र आता राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यामुळे शासन स्वतः या उत्सवाचा मुख्य आयोजक म्हणून काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जागतिक स्तरावर डेटा संकलन व ऑनलाईन दर्शन

जगभरात मोठ्या प्रमाणावर साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या उपक्रमांचा शास्त्रोक्त पद्धतीने डेटा (माहिती) संकलित करून तो जगासमोर मांडण्याची गरज मंत्री शेलार यांनी व्यक्त केली. सार्वजनिक मंडळां सोबतच महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये वर्षानुवर्षे अत्यंत नाविन्यपूर्ण आणि समाजोपयोगी उपक्रमांसह साजरा होणारा घरगुती गणेशोत्सव आणि अशा घराण्यांची माहिती इंटरनेटच्या माध्यमातून जगभर पोहोचवली जाणार आहे. तसेच, राज्यातील जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळे आणि प्रसिद्ध गणेश मंदिरांना ऑनलाईन दर्शन सुविधेमध्ये सामावून घेण्यासाठी तातडीने नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. शासन, गणेश मंडळे, समन्वय समिती आणि मूर्तिकार संघटना यांच्यात उत्तम समन्वय राहावा, यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुढाकाराने एका विशेष समन्वय समितीची स्थापना केली जाणार आहे.

मूर्तिकारांसाठी ‘वेलिंग-खातू’ पुरस्कार जाहीर

गणेशोत्सवात उत्कृष्ट मूर्तिकाम करणाऱ्या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ज्याप्रमाणे उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार दिले जातात, त्याच धर्तीवर प्रसिद्ध मूर्तिकार दीनानाथ वेलिंग आणि विजय खातू यांच्या स्मरणार्थवेलिंग-खातू पुरस्कार’ मूर्तिकारांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी घोषणा यावेळी करण्यात आली.

प्रवासी आणि वाहतूक सुविधांबाबत महत्त्वाच्या सूचना

मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सवात येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी प्रशासनाला खालीलप्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत:

  • बेस्टची विशेष सेवा: प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एकाच तिकिटात बस प्रवास करता येईल, अशी विशेष बस सेवा बेस्टने सुरू करावी.
  • रेल्वे सेवा: रात्री उशिरापर्यंत लोकल फेऱ्या सुरू ठेवण्याबाबत आणि कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या धर्तीवर मुंबई लोकलच्या विशेष फेऱ्या सुरू करण्याबाबत रेल्वे प्रशासनासोबत चर्चा करण्यात यावी.
  • एसटी महामंडळाच्या दरांचा फेरविचार: कोकणात ग्रुप बुकिंग करून जाणाऱ्या एसटी गाड्यांचे परतीचे प्रवासी नसल्यास रिक्त येणाऱ्या गाड्यांवर आकारण्यात आलेली ३० टक्के भाडेवाढ एसटी महामंडळाने फेरविचार करून मागे घ्यावी.
  • पायाभूत सुविधा: मुंबईत विसर्जनाच्या धर्तीवर आगमन मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवणे, रस्त्यांची दुरुस्ती, विसर्जन मार्गावर अतिरिक्त प्रकाशयोजना (लाईटिंग) आणि समुद्र किनाऱ्यावर भाविकांना ‘जेलीफिश’चा त्रास होऊ नये, यासाठी महापालिका व पोलिसांनी तातडीने उपाय योजना कराव्यात.

उत्सवाच्या काळात सर्व मंडळांनी नियमांचे पालन करून अत्यंत शांततेत आणि उत्साहात हा सण जावा, असे आवाहन करतानाच आपली उज्ज्वल परंपरा आता जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी सर्वांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी शेवटी सांगितले.

 

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

पुण्यातील ‘फ्लाईंग जिप्सी’ प्रकरणात कारवाई; मालक-व्यवस्थापकांना अटक

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software