शाहू महाराजांच्या भव्य स्मारकासाठी बैठक; उभारणीला मिळणार गती

मुंबईत छत्रपती शाहू महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी उच्चस्तरीय बैठक संपन्न. ५० वर्षांच्या प्रलंबित मागणीसाठी जागा निश्चितीचे कडक निर्देश.

मुंबई: मुंबईत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे भव्य व प्रेरणादायी स्मारक उभारण्यात यावे, ही मुंबई स्थित कोल्हापूरकरांची गेल्या ५० वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी आता प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. विधान भवनात विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात एका उच्चस्तरीय समन्वय समितीची विशेष बैठक पार पडली. या बैठकीत स्मारकाच्या जागा निश्चितीसह विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली असून, या ऐतिहासिक प्रकल्पाला आता गती मिळणार आहे.

         विधान भवनात पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, आमदार अजय चौधरी, आमदार सुनील शिंदे, आमदार राजेंद्र यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह कोल्हापूर जिल्हा फेडरेशन मुंबईचे अध्यक्ष सूर्यकांत कडाकणे आणि विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकी दरम्यान मुंबईत शाहू महाराजांचे हक्काचे आणि भव्य स्मारक उभे राहण्यासाठी योग्य जागा निवडण्या बाबत गांभीर्याने विचार विनिमय करण्यात आला. मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी स्मारकासाठी तातडीने योग्य जागा निश्चित करून लवकरात लवकर बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

       या स्मारकाच्या उभारणीसाठी पुढाकार घेण्याची विनंती समितीच्या वतीने उपसभापती सचिन अहिर यांना करण्यात आली, ज्याचा स्वीकार करत "राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकासाठी पुढाकार घेण्याची आणि या पवित्र कार्यात सहभागी होण्याची संधी मिळणे हे माझे मोठे भाग्य आहे," अशा शब्दांत सचिन अहिर यांनी आपली भावना व्यक्त केली. गेल्या पाच दशकांपासून प्रलंबित असलेल्या या मागणी मुळे मुंबईत छत्रपती शाहू महाराजांचे भव्य स्मारक उभे राहण्याचा मार्ग सुकर होत असून, या निर्णयामुळे कोल्हापूर सह संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेमध्ये आनंद  आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक समतेचा विचार मुंबईच्या पटलावर अधिक मजबूत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

पुण्यातील ‘फ्लाईंग जिप्सी’ प्रकरणात कारवाई; मालक-व्यवस्थापकांना अटक

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software