संजय राऊत आक्रमक; नार्वेकरांसह निवडणूक आयोगावर गंभीर टीका

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात संजय राऊतांची राहुल नार्वेकर आणि निवडणूक आयोगावर घणाघाती टीका; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले.

मुंबई : शिवसेना पक्ष आणि आमदारांच्या अपात्रते संदर्भातील प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. संवैधानिक संस्थांच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित करत राऊत यांनी नार्वेकर आणि निवडणूक आयोगाला ‘बौद्धिक नक्षलवादी’ अशी उपमा दिली. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.

         सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी दरम्यान ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केलेल्या युक्तिवादाचा संदर्भ देत संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. सिब्बल यांचा युक्तिवाद कायद्याच्या चौकटीत आणि अत्यंत प्रभावी असल्याचे राऊत यांनी म्हटले. शिवसेनेतील आमदारांच्या फुटीच्या प्रकरणात आधी अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय झाला असता, तर त्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती टाळता आली असती, असा दावा त्यांनी केला.

      शिवसेनेतील तत्कालीन राजकीय घडामोडींचा संदर्भ देताना राऊत यांनी सांगितले की, काही आमदार पक्ष सोडून सुरतला गेल्यानंतरच त्यांच्या अपात्रतेची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्या प्रकरणाचा निर्णय प्रलंबित असतानाच विधिमंडळातील संख्या बळाच्या आधारे पुढील प्रक्रिया करण्यात आली, असा आरोप त्यांनी केला. यामुळे पक्षातील फुटीला वैधता मिळाल्याचे राऊत यांनी म्हटले.

       शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हा संदर्भातील निर्णयावरही राऊत यांनी निवडणूक आयोगाला लक्ष्य केले. पक्षातील अंतर्गत वाद आणि विधिमंडळातील फुटीचा आधार घेत पक्षाचे नाव व चिन्ह दुसऱ्या गटाला देण्याच्या प्रक्रियेवर त्यांनी आक्षेप नोंदवला. या संपूर्ण प्रक्रियेमुळे संविधानाच्या मूलभूत तत्त्वांवर परिणाम झाल्याचा आरोप त्यांनी केला.

      राहुल नार्वेकर यांच्या सार्वजनिक भूमिकेवरही राऊत यांनी सवाल उपस्थित केले. विधानसभा अध्यक्ष हे संवैधानिक पद असल्याने त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षापासून तटस्थ राहणे अपेक्षित असल्याचे राऊत यांनी म्हटले. नार्वेकर यांच्या सामाजिक माध्यमांवरील काही राजकीय संदर्भांचा दाखला देत त्यांनी त्यांच्या तटस्थतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

      या प्रकरणात आपल्याला नोटीस बजावली तरी आपण त्याला सामोरे जाण्यास तयार असल्याचेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले. विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयांमुळे संविधानाच्या प्रक्रियेवर परिणाम झाला असल्याचा पुनरुच्चार करत त्यांनी या संस्थांच्या भूमिकेची कठोर शब्दांत चिकित्सा केली. दरम्यान, शिवसेना पक्षातील फुटीशी संबंधित प्रकरण सर्वोच्च न्यायालया समोर असल्याने या प्रकरणातील पुढील सुनावणीकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात असून, या आरोपांवर संबंधितांकडून काय प्रतिक्रिया येते, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

 

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

पुण्यातील ‘फ्लाईंग जिप्सी’ प्रकरणात कारवाई; मालक-व्यवस्थापकांना अटक

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software