पुण्यातील ‘फ्लाईंग जिप्सी’ प्रकरणात कारवाई; मालक-व्यवस्थापकांना अटक

रीलस्टार अथर्व जगताप हल्ला प्रकरणात 'फ्लाईंग जिप्सी' कॅफेचा मालक व मॅनेजर अटक. पुरावा लपवल्याने डेक्कन पोलिसांची कारवाई, महापालिकेकडून हॉटेल सील.

पुणे: पुण्यातील शिरोळे रोडवरील ‘फ्लाईंग जिप्सी’ कॅफेमध्ये रीलस्टार अथर्व जगताप याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आपली कारवाई अधिक तीव्र केली आहे. या गंभीर गुन्ह्यातील रक्ताचे डाग धुवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी हॉटेलचा मालक आणि मॅनेजरला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी यापूर्वीच माधवी कुंभारसह सात जणांना पोलिसांनी अटक केली असून, आता पुरावा लपवल्याप्रकरणी व्यवस्थापनावरही कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

         काही दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास ‘फ्लाईंग जिप्सी’ हॉटेलमध्ये रीलस्टार अथर्व जगताप याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्या दरम्यान हॉटेलच्या आवारात मोठ्या प्रमाणावर रक्ताचे डाग सांडले होते. पोलीस तपासात अडथळा निर्माण करण्याच्या उद्देशाने आणि गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी हॉटेल मालक हेमंत आनंद पाटील (वय ४२, रा. धायरी) आणि हॉटेल मॅनेजर प्रेम पाटील (वय २३, रा. शिरोळे रोड, मूळ रा. ठाणे) यांनी रक्ताचे डाग धुवून टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेत कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर डेक्कन पोलिसांनी रात्री उशिरा दोघांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येत आहे.

     या घटनेच्या निमित्ताने या हॉटेलच्या कारभारातील अनेक काळेबेरे उजेडात आले आहेत. रहिवासी परिसरातील बंगल्याच्या आवारात विना परवाना हॉटेल सुरू करणे, महापालिकेच्या नियमावलीचे उल्लंघन करत मध्यरात्रीपर्यंत हॉटेल सुरू ठेवणे आणि रात्रपाळीत गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या कारवाईला किंवा सूचनेला न जुमानणे, असे अनेक नियमबाह्य प्रकार या हॉटेल मालकाने यापूर्वीही केले होते. या सर्व प्रकारांची गंभीर दखल घेत महापालिकेने अखेर कठोर पावले उचलत या हॉटेलवर धडक कारवाई केली आणि ते सील केले आहे. या घटनेमुळे पुणे शहरातील पब आणि हॉटेल्सच्या मनमानी कारभारावर आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाने अशा प्रवृत्तींवर कडक कारवाईचा बडगा उगारला आहे.

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

पुण्यातील ‘फ्लाईंग जिप्सी’ प्रकरणात कारवाई; मालक-व्यवस्थापकांना अटक

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software