- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेस प्रवेशाच्या दाव्यावर महादेव जाणकरांचा मोठा गौप्यस्फोट; भाजपच्या जाचाला क...
गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेस प्रवेशाच्या दाव्यावर महादेव जाणकरांचा मोठा गौप्यस्फोट; भाजपच्या जाचाला कंटाळले होते मुंडे साहेब
गोपीनाथ मुंडे भाजपच्या जाचाला कंटाळले होते अन् काँग्रेस प्रवेशाचा विचार करत होते, असा दावा महादेव जानकर यांनी केला. पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया.
मुंबई: माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत केलेल्या एका दाव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली होती. गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, मात्र तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विरोधामुळे तो पक्षप्रवेश होऊ शकला नाही, असा दावा चव्हाण यांनी केला होता. या दाव्यावर आता राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख आणि माजी मंत्री महादेव जानकर यांची प्रतिक्रिया समोर आली असून, मुंडे साहेब भाजपच्या अंतर्गत जाचाला कंटाळले होते आणि त्यांचा काँग्रेसमध्ये जाण्याचा विचार सुरू होता, असा मोठा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.
एखादी व्यक्ती हयात नसताना अशा विषयांवर उघडपणे भाष्य करणे योग्य नाही, अशी प्रास्ताविक भूमिका घेत महादेव जानकर म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण हे अतिशय स्वच्छ प्रतिमेचे आणि मोठे नेते आहेत. मात्र, त्या काळी नेमके काय घडले याची मला सविस्तर माहिती नाही कारण मी त्या बैठकीला नव्हतो. परंतु, एक गोष्ट अत्यंत स्पष्ट होती की गोपीनाथ मुंडे हे त्या काळात भाजपच्या जाचाला पूर्णपणे कंटाळले होते, त्यामुळे त्यांचा काँग्रेसमध्ये जाण्याचा विचार सुरू होता, असा दावा जाणकरांनी केला.
दरम्यान, गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशावरून राज्यभरात चर्चांना उधाण आल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या या वक्तव्यावरून माघार घेत यू-टर्न घेतल्याचे पाहायला मिळाले. आपण केलेले वक्तव्य चुकीचे होते, असे म्हणत त्यांनी या प्रकरणावर सारवासारव केली. संसदीय परंपरेचा दाखला देत चव्हाणांनी स्पष्ट केले की, पक्षात कोणाला प्रवेश द्यायचा हे सर्वस्वी पक्षाध्यक्षांच्या अधिकारातील असते, तर मंत्रिपद कोणाला द्यायचे हे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांचे अधिकार क्षेत्र असते. या संपूर्ण घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले असून, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याविषयीच्या या जुन्या राजकीय चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या आहेत.
