- Hindi News
- सातारा
- सातारा आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरा; देसाईंचे निर्देश
सातारा आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरा; देसाईंचे निर्देश
साताऱ्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदे बाह्यस्रोतांद्वारे भरण्याचे काम तातडीने पूर्ण करा. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा आरोग्य आढावा बैठकीत दिले कडक निर्देश.
सातारा: सातारा जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला अधिक गतिमान, सक्षम आणि लोकाभिमुख बनवण्यासाठी राज्य शासनाने आता बाह्यस्रोतांद्वारे (Outsourcing) पदभरती करण्यास मंजुरी दिली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने तातडीने कार्यवाही करत जिल्ह्यातील सर्व रिक्त पदे लवकरात लवकर भरावीत, तसेच ‘स्मार्ट पी.एच.सी.’ (प्राथमिक आरोग्य केंद्र) ची उर्वरित सर्व कामे निश्चित वेळेत पूर्ण करावीत, असे कठोर निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या जिल्हा आरोग्य अभियानाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
या महत्त्वपूर्ण बैठकीस जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राहुल जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खालीपे यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. बैठकीत प्रामुख्याने आरोग्य सुविधांचा विस्तार आणि क्रीडा क्षेत्राच्या विकासाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कामांबाबत बोलताना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी निर्देश दिले की, नियोजन विभातर्फे या प्रकल्पासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी पूर्णपणे आणि योग्य प्रकारे खर्च केला जावा. काही ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रांची कामे अद्याप अपूर्ण आहेत, ती तातडीने पूर्ण करण्याची कार्यवाही करावी. तसेच, ज्या ठिकाणी जुन्या इमारतींच्या निर्लेखनाचे (Condemnation) काम प्रलंबित आहे, ते मार्गी लावावे. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दर्जेदार वास्तूंची उभारणी पूर्ण झाल्यानंतरच पुढील नवीन निधीसाठी मागणी करावी, अशी सूचना त्यांनी दिली.
क्रीडा संकुलाच्या कामांना गती देण्याचे आदेश
आरोग्य अभियानाच्या बैठकीनंतर याच ठिकाणी जिल्हा क्रीडा संकुल समितीचीही महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा संकुलात आधुनिक सिंथेटिक ट्रॅक तयार करणे आणि इतर प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच, स्थानिक स्तरावर खेळाडूंना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी जलतरण तलावाची थकीत असलेली रक्कम वसुलीस या बैठकीत अधिकृत मंजुरी प्रदान करण्यात आली. या सर्व उपाययोजनांमुळे सातारा जिल्ह्यातील आरोग्य आणि क्रीडा पायाभूत सुविधा अधिक बळकट होण्यास मोठी मदत होणार आहे.
