येवला रुग्णालयात २.३५ कोटींचे अत्याधुनिक शस्त्रक्रियागृह

येवला उपजिल्हा रुग्णालयात ₹२.३५ कोटी खर्चून उभारलेल्या मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन. HEPA फिल्टर व आधुनिक सोयी सज्ज.

नाशिक: सर्वसामान्य नागरिकांना अधिक सुरक्षित, आधुनिक आणि दर्जेदार शस्त्रक्रिया सेवा थेट स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय आरोग्य यंत्रणा अधिकाधिक सक्षम करण्यात येत आहे. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, आवश्यक आधुनिक उपकरणे तसेच प्रशिक्षित मनुष्यबळाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पुरवण्याला राज्य शासनाचे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. येवला येथील उपजिल्हा रुग्णालयात सुमारे २ कोटी ३५ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक ‘मॉड्युलर ऑपरेशन थिएटर’चे औपचारिक उद्घाटन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात संपन्न झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.

       या महत्त्वाच्या उद्घाटन सोहळ्याला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश शिंपी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रमाकांत सोनवणे, निवासी वैद्यकीय अधिकारी संदीप सूर्यवंशी, अनंत पवार यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

      या नवीन सुविधेविषयी माहिती देताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, येवला उपजिल्हा रुग्णालयात कार्यान्वित करण्यात आलेल्या या अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटरमुळे येथील शस्त्रक्रिया विभाग अधिक आधुनिक, सुरक्षित, स्वच्छ आणि पूर्णपणे रुग्णाभिमुख बनला आहे. या ऑपरेशन थिएटरची रचना आधुनिक वैद्यकीय मानके आणि तांत्रिक निकषांचा सखोल विचार करून करण्यात आली आहे. या सुविधेमध्ये विशेष सर्जिकल निर्जंतुकीकरण व्यवस्था, एचईपीए (HEPA) फिल्टर आणि पॉझिटिव्ह एअर प्रेशर प्रणाली बसवण्यात आली आहे, ज्यामुळे ऑपरेशन थिएटरमधील हवा पूर्णपणे शुद्ध आणि नियंत्रित राहून संसर्गाचा धोका किमान पातळीवर आणण्यास मदत होते. तापमान व आर्द्रतेचे अचूक नियंत्रण राखणारी ही यंत्रणा शस्त्रक्रियेदरम्यान अत्यंत सुरक्षित आणि निर्जंतुक वातावरण तयार करते.

       याशिवाय, या मॉड्युलर ऑपरेशन थिएटरमध्ये अत्याधुनिक ॲनेस्थेशिया मशीन्स, उच्च दर्जाचे ओटी लाइट्स (OT Lights), सर्जिकल पेंडंट, मेडिकल गॅस सिस्टीम आणि प्रगत मॉनिटरिंग सिस्टम यांसारख्या अत्याधुनिक उपकरणांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व उपकरणांमुळे विविध प्रकारच्या क्लिष्ट आणि गंभीर शस्त्रक्रिया अधिक कार्यक्षमतेने व सुरक्षित वातावरणात पार पाडणे शक्य होणार आहे. उपलब्ध जागेचा अत्यंत परिणामकारक वापर करत भविष्यातील वैद्यकीय गरजांनुसार या यंत्रणेत आवश्यक ते बदल करणेही आता सुलभ झाले आहे.

       मुंबई, पुणे आणि नाशिक यांसारख्या महानगरांमधील मोठ्या रुग्णालयांमध्ये ज्या उच्चस्तरीय वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतात, त्याच धर्तीवर आता येवला उपजिल्हा रुग्णालयातही अत्याधुनिक शस्त्रक्रिया सेवा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना उपचारासाठी मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज उरलेली नाही. स्थानिक पातळीवरच दर्जेदार, स्वच्छ आणि संसर्गनियंत्रित वातावरणात आधुनिक शस्त्रक्रिया सेवा मिळण्याचा मार्ग सुकर झाल्यामुळे येवल्याच्या आरोग्य सेवेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, यामुळे ग्रामीण रुग्णालयाचा कायापालट होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

 

 

 

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

मराठी चित्रपटसृष्टीत सरकारची गुंतवणूक; ‘जेन झी’ला जोडण्याचा प्रयत्न

Latest News

मराठी चित्रपटसृष्टीत सरकारची गुंतवणूक; ‘जेन झी’ला जोडण्याचा प्रयत्न मराठी चित्रपटसृष्टीत सरकारची गुंतवणूक; ‘जेन झी’ला जोडण्याचा प्रयत्न
'जेन झी' प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या मराठी चित्रपटात महाराष्ट्र शासन गुंतवणूक करणार. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा.
पूर्ण पाणीपुरवठा योजना तातडीने ग्रामपंचायतींकडे हस्तांतरित करा; गुलाबराव पाटील
‘मराठी सक्तीची नव्हे, भक्तीची भाषा’; एकनाथ शिंदेंचा संदेश
बेस्ट कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू; मुंबईकरांना बसणार फटका
हिंजवडी आयटी पार्कमधील १५ लाख नोकऱ्यांवर संकट? कंपन्या महाराष्ट्र सोडण्याच्या तयारीत असल्याचा आदित्य ठाकरेंचा दावा

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software