नोकरी शोधू नका, नोकऱ्या निर्माण करा; राज्यपालांचा अभियंत्यांना संदेश

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या दीक्षान्त सोहळ्यात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे भाषण. ४०० मुलींच्या वसतिगृहाची चंद्रकांत पाटलांची घोषणा.

पुणे: भारताच्या आर्थिक वाढीत आणि राष्ट्रीय विकासात अर्थपूर्ण योगदान देतील अशा तंत्र उद्योजकांची आणि नवोन्मेषकांच्या नवीन पिढीला घडवणारी अग्रगण्य संस्था म्हणून सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाने नावलौकिक मिळवला आहे. अभियंत्यांनी केवळ पारंपारिक रोजगार शोधण्याऐवजी इतरांसाठी संधी आणि नोकऱ्या निर्माण करतील अशी तंत्रज्ञान निर्मिती, उद्योग आणि संस्था स्थापन कराव्यात, असे प्रेरणादायी आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी केले. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

        या दिमाखदार सोहळ्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, विद्यापीठाचे नियामक मंडळाचे अध्यक्ष विनायक पै, कुलगुरू प्रा. सुनील भिरुड, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, कुलसचिव डॉ. दयाराम सोनवणे, तसेच परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. यशोधरा हरिभक्त यांच्यासह अनेक मान्यवर, प्राध्यापक आणि पदवीधारक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        सीओईपी हा जवळपास दोन शतकांचा समृद्ध वारसा लाभलेली संस्था असून तिने देशाचे भविष्य घडवण्यात मोलाचे योगदान दिले आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी काढले. संस्थेने केवळ एक तांत्रिक शिक्षण संस्था न राहता विचार, नवोपक्रम आणि जागतिक पातळीवरील समस्या सोडवण्याचे केंद्र बनले पाहिजे. स्वच्छ ऊर्जा, जल सुरक्षा, शाश्वत गतिशीलता, प्रगत उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सेमीकंडक्टर्स आणि हवामान बदल यांसारख्या क्षेत्रातील आव्हानांकडे केवळ समस्या म्हणून न पाहता परिवर्तनात्मक उपायांच्या संधी म्हणून पाहिले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, माजी विद्यार्थ्यांचे बौद्धिक भांडवल विद्यापीठाच्या प्रयोगशाळा आणि स्टार्टअप परिसंस्थेशी जोडल्यास एक मजबूत नवोपक्रमाचे चक्र तयार होईल, असेही त्यांनी नमूद केले.

विद्यार्थिनींसाठी ४०० क्षमतेचे नवीन वसतिगृह आणि आर्थिक मदतीची घोषणा

कार्यक्रमात बोलताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विद्यापीठाच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. सीओईपीच्या कॅम्पसमध्ये मुलींसाठी वसतिगृहाची कमतरता लक्षात घेता, ४०० विद्यार्थिनी क्षमतेचे अत्याधुनिक वसतिगृह शासकीय निधी आणि सीएसआरच्या माध्यमातून तातडीने उभारण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. तसेच ग्रामीण भागातील ज्या विद्यार्थिनींना वसतिगृह भरणे अडचणीचे आहे, अशा १० विद्यार्थिनींना दरमहा १० हजार रुपयांप्रमाणे १० महिन्यांसाठी १ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. याशिवाय ‘कमवा आणि शिका’ योजने अंतर्गत ५० विद्यार्थ्यांना दरमहा २ हजार रुपये देण्याची घोषणाही त्यांनी केली.

        गेल्या दोन वर्षांत राज्य शासनाने ८ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या सर्व मुलींचे शिक्षण व परीक्षा शुल्क माफ केल्यामुळे उच्च शिक्षणातील मुलींचे प्रमाण झपाट्याने वाढले असून, यावर्षी मुलींची संख्या मुलांपेक्षाही अधिक होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. सीओईपीने आयआयटीच्या दर्जाचे संशोधन करून विद्यार्थी संख्या १० हजारावर नेण्याचे ध्येय ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.

पदवीप्रदान सोहळ्यात विद्यार्थ्यांचा गौरव

       विद्यापीठाचे नियामक मंडळाचे अध्यक्ष विनायक पै यांनी मनोगतात सांगितले की, भारत आता 'उत्पादन-केंद्रित राष्ट्र' बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असून, चिखली येथील नवीन संशोधन संकुल महाराष्ट्रातील सर्वोत्तम संशोधन केंद्रांपैकी एक ठरेल. कुलगुरू प्रा. सुनील भिरुड यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा अहवाल सादर करताना सांगितले की, या दीक्षान्त समारंभात पदवीच्या ८८९ आणि पदव्युत्तर पदवीच्या ५८२ विद्यार्थ्यांना अधिकृतपणे पदव्या प्रदान करण्यात आल्या आहेत. तसेच विविध शाखांमध्ये उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

मुंबईच्या प्रदूषणावर ‘एआय’ची नजर; ३ दिवस आधी मिळणार हवेचा अंदाज

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software