- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- एसबीआयमध्ये लिपिक पदांसाठी मेगा भरती; २७ ऑगस्ट पर्यंत अर्ज
एसबीआयमध्ये लिपिक पदांसाठी मेगा भरती; २७ ऑगस्ट पर्यंत अर्ज
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये १,५३८ ज्युनियर असोसिएट (लिपिक) पदांसाठी भरती जाहीर. पदवीधरांसाठी संधी, २७ ऑगस्ट २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करा.
मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) लिपिक संवर्गातील ज्युनियर असोसिएट (कस्टमर सपोर्ट अँड सेल्स) पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत देशभरात एकूण १,५३८ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांना एसबीआयच्या अधिकृत संकेत स्थळावरून ऑनलाइन अर्ज करता येणार असून, अर्ज करण्याची प्रक्रिया ७ ऑगस्ट २०२६ पासून सुरू झाली आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २७ ऑगस्ट २०२६ आहे.
एसबीआयच्या लिपिक भरतीसाठी मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समकक्ष शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. अर्जदारांचे वय २० वर्षांपेक्षा कमी आणि २८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. वयोमर्यादेत नियमा नुसार सवलत लागू असलेल्या उमेदवारांना संबंधित नियमांनुसार सवलत मिळणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना देशभरातील एसबीआयच्या संबंधित कार्यालयांमध्ये नियुक्ती मिळू शकते.
या भरतीसाठी अर्ज शुल्क प्रवर्गा नुसार निश्चित करण्यात आले आहे. खुल्या प्रवर्गातील सर्वसाधारण, इतर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना ७५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग आणि इतर पात्र आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे. एकदा भरलेले अर्ज शुल्क किंवा सूचना शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नसल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.
एसबीआयच्या लिपिक भरतीची निवड प्रक्रिया टप्प्या टप्प्याने होणार आहे. यामध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि उमेदवाराने निवडलेल्या स्थानिक भाषेची चाचणी यांचा समावेश असेल. लिपिक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना भरती प्रक्रियेतील आवश्यक टप्पे यशस्वीपणे पूर्ण करणे बंधनकारक राहणार आहे.
उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरताना वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक तपशील काळजीपूर्वक नमूद करावेत. तसेच मागणी नुसार आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांची माहिती देऊन अर्ज शुल्क भरावे. अंतिम मुदतीनंतर अर्ज स्वीकारले जाणार नसल्याने पात्र उमेदवारांनी २७ ऑगस्ट २०२६ पूर्वी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
एसबीआय लिपिक भरती २०२६ : ठळक मुद्दे
- भरती संस्था : स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)
- पद : ज्युनियर असोसिएट (कस्टमर सपोर्ट अँड सेल्स)
- एकूण रिक्त जागा : १,५३८
- नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
- शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
- वयोमर्यादा : २० ते २८ वर्षे
- अर्ज पद्धत : ऑनलाइन
- अर्ज सुरू होण्याची तारीख : ७ ऑगस्ट २०२६
- अर्जाची अंतिम तारीख : २७ ऑगस्ट २०२६
- अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग ७५० रुपये; पात्र आरक्षित प्रवर्गासाठी शुल्क नाही
- निवड प्रक्रिया : पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि स्थानिक भाषा चाचणी
