- Hindi News
- सातारा
- दिडवाघवाडीत वीज व्यवस्थेला बळ; दोन नवीन रोहित्रांचे उद्घाटन
दिडवाघवाडीत वीज व्यवस्थेला बळ; दोन नवीन रोहित्रांचे उद्घाटन
माण तालुक्यातील दिडवाघवाडी येथे मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून २ नवीन विद्युत रोहित्र (DP) कार्यान्वित. शेतीला मिळणार अखंड वीजपुरवठा.
दहिवडी: माण तालुक्यातील दिडवाघवाडी येथील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या दिर्घकाळ प्रलंबित असलेल्या वीज समस्येवर मोठा दिलासा दायक तोडगा निघाला आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या दोन नवीन विद्युत रोहित्रांचे (डीपी) लोकार्पण सोहळा सौ. सोनिया जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हस्ते अत्यंत उत्साहात पार पडला. या नवीन रोहित्रांमुळे परिसरातील शेतीसाठी स्थिर आणि अखंडित वीजपुरवठा उपलब्ध होणार असून, शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
दिडवाघवाडीतील सरगर गोठा आणि सदाशिव रामचंद्र गोरड वस्तीवरील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी वीज पुरवठ्यातील अडचणी बाबत मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे मागणी केली होती. या जनहिताच्या मागणीची तातडीने दखल घेत मंत्री गोरेंनी महावितरण विभागाच्या माध्यमातून तात्काळ निधी उपलब्ध करून दिला आणि पाठपुरावा करून अल्पावधीतच हे काम पूर्ण करून घेतले. नवीन रोहित्र कार्यान्वित झाल्यामुळे वीजेच्या अपुऱ्या दाबाचा किंवा लपंडावाचा प्रश्न सुटणार असून, ऐन हंगामात शेतीच्या कामांना मोठा वेग मिळणार आहे.
या लोकार्पण सोहळ्यात उपस्थितांशी संवाद साधताना सौ. सोनिया गोरे यांनी सांगितले की, ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास आणि लोक कल्याणासाठी आवश्यक असणारे सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करून जनतेच्या सेवेत आणणे हेच मंत्री जयकुमार गोरे यांच्या कार्य शैलीचे मुख्य वैशिष्ट्य आहे. मंत्री गोरेंच्या सातत्य पूर्ण पाठ पुराव्यामुळेच माण-खटाव तालुक्या सह परिसरातील विविध पाणीपुरवठा योजना यशस्वीपणे मार्गी लागल्या आहेत. गेल्या १३ वर्षांपासून या भागातील शेतकऱ्यांना उरमोडी आणि तारळी योजनेचे बारमाही पाणी मिळत असून, यामुळे या दुष्काळी भागातील शेती समृद्ध होण्यास मोठी मदत झाल्याचे त्यांनी या वेळी आवर्जून नमूद केले. प्रलंबित प्रश्न अत्यंत अल्प वेळात मार्गी लावून शेतकऱ्यांना दिलासा दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सौ. सोनिया गोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे आणि मंत्री जयकुमार गोरे यांचे स्वीय सहाय्यक अभिजीत काळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास माजी सरपंच पै. संजय दिडवाघ, सरपंच सविता दिडवाघ, सदाशिव गोरड, नारायण दिडवाघ, दिवडचे सरपंच संजय सावंत, सतीश घुटूकडे, डॉ. अभिजीत सावंत, पै. अनिल सरगर यांच्यासह विविध क्षेत्रांतील लोकप्रतिनिधी, महावितरणचे अधिकारी-कर्मचारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. या विकासकामामुळे दिडवाघवाडीच्या विकासात आणखी एक मानाचा तुरा जोडला गेला आहे.
