- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- देशातील पहिला ‘स्पेस पार्क’ महाराष्ट्रात; १८ महिन्यांत ५ उपग्रह अवकाशात झेपावणार
देशातील पहिला ‘स्पेस पार्क’ महाराष्ट्रात; १८ महिन्यांत ५ उपग्रह अवकाशात झेपावणार
महाराष्ट्रात देशातील पहिला स्पेस पार्क उभारला जाणार. आगामी १८ महिन्यांत ५ उपग्रह अवकाशात सोडण्याची उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांची घोषणा.
सिंधुदुर्ग: महाराष्ट्राला अंतराळ संशोधन, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रातील जागतिक केंद्र बनविण्याच्या दिशेने राज्य शासनाने अत्यंत महत्त्वाचे आणि ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. देशातील पहिला भव्य ‘स्पेस पार्क’ महाराष्ट्रात उभारण्यात येणार असून, राज्याच्या स्वतंत्र धोरणांतर्गत आगामी अवघ्या १८ महिन्यांत पाच बहुउद्देशीय उपग्रह विकसित करून त्यांचे यशस्वी प्रक्षेपण करण्याचा अत्यंत महत्त्वाकांक्षी संकल्प शासनाने सोडला आहे. कोकणातील वेंगुर्ला येथे आयोजित एका विशेष पत्रकार परिषदेत उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी ही अत्यंत गौरवास्पद घोषणा केली आहे. या ऐतिहासिक प्रकल्पामुळे महाराष्ट्राचे नाव आता जागतिक अंतराळ नकाशावर आणखी ठळकपणे उमटणार आहे.
फ्रान्स मधील पॅरिस येथे नुकत्याच पार पडलेल्या मानाच्या ‘पॅरिस वर्ल्ड स्पेस बिझनेस वीक’ परिषदे मध्ये जागतिक पातळीवरील अग्रगण्य अंतराळ कंपन्यां सोबत महाराष्ट्राच्या नव्या अंतराळ धोरणा बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली होती. या जागतिक परिषदेत झालेल्या सकारात्मक वाटाघाटींमधून काही अत्यंत दूरगामी निर्णय घेण्यात आले आहेत, ज्याचा थेट फायदा महाराष्ट्रातील उच्च तंत्रज्ञान उद्योग, वैज्ञानिक संशोधन आणि नवउद्योजकांना मिळार आहे. फ्रान्स आणि भारत यांच्यातील औद्योगिक आणि तंत्रज्ञान विषयक ऐतिहासिक सहकार्याचा वारसा या उपक्रमामुळे अधिक मजबूत होईल, असा ठाम विश्वास मंत्री डॉ. सामंत यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या सक्षम व दूरगामी मार्गदर्शनाखाली राज्यात आधुनिक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणारे धोरण राबवले जात असून, अंतराळ क्षेत्रात महाराष्ट्राची एक स्वतंत्र आणि बलवान ओळख निर्माण करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
राज्यातील तरुण पिढीसाठी रोजगाराच्या अत्यंत उच्च दर्जाच्या संधी निर्माण करणे आणि बेरोजगारीचे प्रमाण आटोक्यात आणणे हा या स्पेस पॉलिसीचा गाभा आहे. शासनाने देशातील पहिली अभिनव ‘स्पेस पॉलिसी’ प्रत्यक्षात आणत जगभरातील स्पेस टेक कंपन्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी आमंत्रित केले आहे. या धोरणामुळे भविष्यात अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर उद्योग उभे राहून हजारो कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल आणि मोठा महसूल राज्याला प्राप्त होईल, अशी दाट अपेक्षा आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून विकसित केले जाणारे हे पाच बहुउद्देशीय उपग्रह केवळ वैज्ञानिक संशोधनापुरते सीमित नसून, मानवी जीवनाशी आणि शाश्वत विकासाशी जोडलेल्या विविध क्षेत्रांसाठी वरदान ठरणार आहेत. कृषी क्षेत्राचा पद्धतशीर विकास, पर्यावरण संवर्धन, आपत्ती व्यवस्थापन, प्रगत शहरी नियोजन, दर्जेदार आरोग्य सेवा तसेच औद्योगिक क्षेत्रातील अचूक नियोजनासाठी या उपग्रहांद्वारे मिळणाऱ्या अचूक माहितीचा मोठा उपयोग केला जाणार आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या प्राथमिक टप्प्यात सुमारे दोनशे कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून, आगामी काळात याद्वारे एक हजार कोटी रुपयांचा महसूल कमावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या उपग्रह प्रकल्पाच्या यशस्वी आणि अचूक अंमलबजावणीसाठी प्रशासना कडून राज्यातील विविध संभाव्य ठिकाणांची प्राथमिक पाहणी पूर्ण करण्यात आली आहे. अंतराळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील अनंत संधी, संशोधनाला मिळणारे व्यासपीठ आणि उद्योजकांना सामावून घेण्यासाठी आगामी फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय पातळीवरील भव्य ‘स्पेस फेस्ट’चे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री डॉ. सामंत यांनी दिली. या सर्व क्रांतिकारी पावलांमुळे महाराष्ट्र देशातच नव्हे, तर जागतिक स्तरावर स्पेस टेक्नॉलॉजीचे हब बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.
