- Hindi News
- पुणे
- पुणे महापालिकेची धडक कारवाई; लोहगावातील ११ पीजी-हॉस्टेल सील
पुणे महापालिकेची धडक कारवाई; लोहगावातील ११ पीजी-हॉस्टेल सील
पुणे महापालिकेने लोहगावातील ११ अनधिकृत पीजी व हॉस्टेल सील केले. अग्निसुरक्षेचे नियम मोडणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाईचा मनपाचा इशारा.
लोहगाव: पुणे शहरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुणे महानगरपालिकेने (PMC) अत्यंत कठोर पावले उचलली असून, अग्निसुरक्षेची कोणतीही यंत्रणा नसलेल्या आणि विनापरवाना सुरू असलेल्या बेकायदेशीर आस्थापनांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे. लोहगाव परिसरातील निंबाळकरनगर भागात आवश्यक परवानग्या न घेता आणि अग्निसुरक्षेचे कसलेही नियम पाळता चालविण्यात येणाऱ्या तब्बल ११ पीजी (Paying Guest) आणि हॉस्टेलवर पुणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शुक्रवारी (दि. १८) धाड टाकून ती तात्काळ सील केली आहेत. विशेष म्हणजे, या तीन ते चार मजली इमारतींमध्ये शंभरहून अधिक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी अत्यंत धोकादायक वातावरणात राहत असल्याचे तपासणीत उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
देशभरात यापूर्वी घडलेल्या विविध दुर्दैवी आगीच्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील रुग्णालये, शैक्षणिक क्लासेस, पीजी आणि हॉस्टेलचे काटेकोर ‘अग्निसुरक्षा ऑडिट’ करण्याचे कडक आदेश महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी अग्निशमन विभाग प्रमुख गणेश सोनुने यांना दिले होते. या उच्चस्तरीय आदेशाची अंमलबजावणी करत अग्निशमन विभागाच्या पथकाने शुक्रवारी लोहगाव-निंबाळकरनगर परिसरातील विविध पीजी आणि हॉस्टेलची प्रत्यक्ष पाहणी सुरू केली. या पाहणी दरम्यान या बहुतांश इमारतींमध्ये आपत्कालीन प्रसंगी वापरली जाणारी कोणतीही प्राथमिक अग्निशमन यंत्रणा उपलब्ध नसल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. विशेषतः तीन ते चार मजली उंच इमारतींमध्ये मोठ्या संख्येने तरुण विद्यार्थी राहत असल्याने, एखाद्या वेळी दुर्दैवाने आग किंवा शॉर्ट सर्किटसारखी दुर्घटना घडल्यास मोठी जीवितहानी होण्याचा अत्यंत गंभीर धोका निर्माण झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
तपासणी दरम्यान या अनधिकृत आस्थापनांचे बिंग फुटले असून, संबंधित इमारतींकडे अधिकृत बांधकाम परवानगी, व्यावसायिक स्वरूपात पीजी किंवा हॉस्टेल चालवण्यासाठी आवश्यक असणारी स्थानिक प्रशासनाची मंजुरी, योग्य ड्रेनेज व्यवस्था, नियमित पाणीपुरवठा मंजुरी, स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र तसेच अग्निशमन विभागाचे सक्तीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) यांसारख्या मूलभूत परवानग्यांचा पूर्णपणे अभाव असल्याचे समोर आले. कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पीजीमध्ये जाऊन तेथे वास्तव्य करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्राथमिक चौकशीत काही विद्यार्थ्यांना परिसरातील संबंधित महाविद्यालयांकडूनच या पीजींचे संदर्भ आणि माहिती मिळाल्याचे उघड झाले. नियमांचे उल्लंघन करून निष्पाप विद्यार्थ्यांना अशा असुरक्षित आणि धोकादायक ठिकाणी राहण्यास प्रवृत्त करणाऱ्या किंवा पाठविणाऱ्या संबंधित शैक्षणिक संस्था तसेच संबंधित जागा मालकां विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
या कारवाई नंतर पुणे महानगरपालिकेने शहरात एकप्रकारे इशाराच दिला असून, यापुढे पुणे शहरातील शाळा, महाविद्यालये, विद्यार्थी हॉस्टेल, पीजी आणि रुग्णालयांची अग्निसुरक्षेच्या निकषांच्या आधारे नियमित व कसून तपासणी केली जाणार आहे. सुरक्षिततेच्या नियमांचे पालन न करणाऱ्या कोणत्याही आस्थापनाची गय केली जाणार नाही आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. तसेच शहरातील सर्व संबंधित इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा सदैव कार्यरत आणि सुस्थितीत ठेवण्याच्या सक्त सूचना महापालिकेने दिल्या असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले आहे.
