- Hindi News
- पुणे
- उजनी धरणातील मासेमारी ठेकेदारीला स्थगिती; पारंपरिक मच्छीमारांच्या उपोषणाला यश
उजनी धरणातील मासेमारी ठेकेदारीला स्थगिती; पारंपरिक मच्छीमारांच्या उपोषणाला यश
उजनी धरणातील मासेमारी ठेकेदारी पद्धतीला स्थगिती. पुण्यात पारंपरिक मच्छीमारांच्या आमरण उपोषणाला यश; प्रशासनाने दिले लेखी पत्र.
पुणे: उजनी धरण क्षेत्रातील मासेमारी ठेकेदारी पद्धतीने देण्याच्या वादग्रस्त निर्णया विरोधात पुण्यात सुरू असलेल्या तीव्र आंदोलनाला मोठे यश आले असून, प्रशासनाने अखेर या ठेकेदारी प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. भोई, कोळी, आदिवासी, भिल्ल आणि फासे पारधी समाजातील हजारो कुटुंबांच्या पिढ्यान् पिढ्यांच्या पारंपरिक रोजगारावर आणि हक्काच्या व्यवसायावर गदा आणणाऱ्या या निर्णया विरुद्ध छेडण्यात आलेल्या आमरण उपोषणापुढे अखेर प्रशासनाला झुकवे लागले आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यालया समोर पार पडलेल्या या आंदोलना दरम्यान प्रशासनाने स्थगितीचे अधिकृत लेखी पत्र दिल्यानंतर हे उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले आहे.
उजनी धरण परिसरात पिढ्यान्पिढ्या विविध पारंपरिक समाजघटक मासेमारी करून आपला प्रामाणिक उदरनिर्वाह चालवत आहेत. मात्र, या जलसंपत्तीवर आणि व्यवसायावर काही राजकीय मंडळी व खाजगी ठेकेदारांचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी ठेकेदारी पद्धत लादण्याचा घाट घातला गेला होता. या अन्यायकारक हजारो कुटुंबांच्या जगण्याचाच प्रश्न निर्माण झाल्यामुळे संतापलेल्या मच्छीमार बांधवांनी, विशेषतः महिला व युवकांनी पुण्यातील सिंचन भवन कार्यालया समोर आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला होता. या न्याय्य आणि हक्काच्या लढ्याला पिंपरी-चिंचवड मधील सामाजिक चळवळीचे नेते मारुती भापकर यांनी भक्कम पाठिंबा देत प्रत्यक्ष आंदोलनात सहभाग घेतला होता. प्रशासनाने या गंभीर समस्येची तातडीने दखल न घेतल्यास पिंपरी-चिंचवडसह राज्यातील विविध जनचळवळी या आंदोलनात उतरतील, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला होता.
आंदोलनाची वाढती धग आणि मच्छीमार समाजाचा आक्रमक व एकमुखी विरोध पाहून प्रशासनाने अखेर नमते घेत ठेकेदारी प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. आंदोलन स्थळी स्थगितीचे पत्र सुपूर्द केल्यानंतर उपोषण तूर्तास मागे घेण्यात आले. या यशस्वी लढ्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी सर्व सहभागी महिला, युवक आणि मच्छीमार बांधवांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. मात्र, हा लढा केवळ तात्पुरता जिंकला असला तरी धोके अद्याप टळलेले नाहीत, अशी सावध भूमिका त्यांनी मांडली आहे. भविष्यात राजकीय नेते आणि ठेकेदार आपापसात संगनमत करून पुन्हा एकदा विविध मार्गांनी ही ठेकेदारी पद्धत मागच्या दरवाजाने लागू करण्याचा प्रयत्न करू शकतात, अशी दाट शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
त्यामुळे पारंपरिक मच्छीमार बांधवांनी कोणत्याही स्थितीत गाफील न राहता कायम जागृत राहावे आणि भविष्यातील कोणत्याही अन्याया विरुद्ध संघर्षासाठी सदैव सज्ज राहावे, असे आवाहन भापकर यांनी केले आहे. मच्छीमार समाजाचा रोजगार, पारंपरिक उपजीविका आणि हक्कांचे जतन पूर्णपणे होईपर्यंत हा संघर्ष असाच सुरू राहील आणि प्रसंगी पुन्हा रस्त्यावर उतरून खांद्याला खांदा लावून लढू, असा दृढ संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. प्रशासनाच्या या स्थगितीमुळे मच्छीमारांना तात्कालिक दिलासा मिळाला असला, तरी भविष्यातील सावधगिरीच्या भूमिकेमुळे या प्रकरणाची चर्चा राजकीय व सामाजिक वर्तुळात कायम आहे.
