दाऊदच्या ड्रग्स नेटवर्कवर ईडीचा मोठा प्रहार; सलीम डोलाच्या पंटरसह १० जणांविरोधात आरोपपत्र

दाऊद इब्राहिमच्या ड्रग्ज आणि हवाला नेटवर्कवर ईडीचा मोठा प्रहार. सलीम डोलाच्या हस्तकांसह १० जणांविरोधात कोर्टात चार्जशीट दाखल.

मुंबई : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कथित ड्रग्स तस्करी आणि आर्थिक व्यवहारांच्या नेटवर्क विरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. दाऊदचा निकटवर्तीय मानला जाणारा आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्कर सलीम डोला याच्याशी संबंधित प्रकरणात ईडीने विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात एमडी (मेफेड्रॉन) ड्रग्स तस्करीशी संबंधित फैसल शेख, त्याची पत्नी अल्फिया शेख आणि इतर आठ जणांचा समावेश आहे.

या प्रकरणाचा तपास नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) कारवाईनंतर सुरू करण्यात आला होता. मनी लाँड्रिंगच्या संशयावरून ईडीने मुंबईतील आठ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले होते. या कारवाईत फैसल शेख, अल्फिया शेख आणि इतर आरोपींना अटक करण्यात आली होती. तपासात फैसल शेख हा सलीम डोलासाठी ड्रग्स तस्करीचे जाळे चालवत असल्याचे समोर आल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे.

तपासादरम्यान एमडी ड्रग्सची विक्री करून मिळणारा पैसा विविध बँक खात्यांद्वारे फिरवला जात असल्याचे उघड झाले. सामिया खान, नासिर यासिन खान आणि इतर साथीदार ड्रग्सची विक्री करत होते. त्यातून मिळणारी रक्कम फैसल शेख आणि अल्फिया शेख यांच्या खात्यांमध्ये जमा केली जात होती. त्यानंतर हा पैसा फैजान मोहम्मद शफी शेख याच्यामार्फत विविध बोगस कंपन्या आणि हवाला व्यवहारांच्या माध्यमातून पुढे पाठवला जात असल्याचा आरोप ईडीने केला आहे.

तपास यंत्रणांच्या मते, या संपूर्ण रॅकेटचा सूत्रधार सलीम डोला असून देशातील अनेक मोठ्या ड्रग्स प्रकरणांचे धागेदोरे त्याच्यापर्यंत पोहोचतात. यापूर्वी त्याचा मुलगा ताहिर डोला यालाही दुबईतून भारतात हद्दपार करण्यात आले होते. त्याचाही या अवैध नेटवर्कशी संबंध असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला होता.

आता विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्याने या प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रिया वेगाने पुढे जाण्याची शक्यता आहे. तसेच ड्रग्स तस्करी, मनी लाँड्रिंग आणि हवाला व्यवहारांच्या या जाळ्याबाबत पुढील तपासातून आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

 

 

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

'ड्रग्ज फ्री मुंबई' अभियानाची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात

Latest News

'ड्रग्ज फ्री मुंबई' अभियानाची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात 'ड्रग्ज फ्री मुंबई' अभियानाची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'ड्रग्ज फ्री मुंबई' अभियानाची सुरुवात. drugfreemumbai.org वर नशामुक्तीची शपथ घेऊन मिळवा प्रमाणपत्र.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय नव्या पत्त्यावर; एअर इंडिया इमारत बनणार राज्याचे नवे प्रशासकीय केंद्र
पुण्यात रिक्षा प्रवास महागण्याची शक्यता; पहिल्या दीड किमीसाठी २५ ऐवजी ३० रुपये प्रस्तावित
पुण्यात वाहन क्रमांकात मोठा बदल; 'MH-12' मालिका संपण्याच्या मार्गावर
दाऊदच्या ड्रग्स नेटवर्कवर ईडीचा मोठा प्रहार; सलीम डोलाच्या पंटरसह १० जणांविरोधात आरोपपत्र

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software