- Hindi News
- सातारा
- आलमट्टी धरणावरून महाराष्ट्र आक्रमक; कर्नाटकला थेट इशारा
आलमट्टी धरणावरून महाराष्ट्र आक्रमक; कर्नाटकला थेट इशारा
आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या कर्नाटक सरकारच्या हालचालींवर महाराष्ट्र सरकारचा तीव्र विरोध. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा इशारा.
कोल्हापूर:सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला दरवर्षी बसणाऱ्या महापुराच्या समस्येबाबत राज्य सरकारने पुन्हा एकदा आपली भूमिका अत्यंत कठोर शब्दांत स्पष्ट केली आहे. कर्नाटक सरकारकडून आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या हालचाली सुरू असतानाच, महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी याला कडाडून विरोध दर्शवला आहे. कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी कर्नाटकला थेट इशारा दिला असून, केंद्र सरकारनेही या उंची वाढीला कोणतीही मंजुरी दिलेली नाही, असे स्पष्ट केले आहे.
आलमट्टी धरणातील अतिरिक्त पाणीसाठा आणि पाण्याच्या फुगवट्यामुळे सांगली व कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांना पूरस्थितीचा सामना करावा लागतो, हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात बोलताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, " आलमट्टी धरणामुळे सांगली आणि कोल्हापूरला महापुराचा मोठा फटका बसतो, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे राज्य सरकारचा आलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास तीव्र विरोधच आहे आणि केंद्रानेही याला परवानगी दिलेली नाही. जर कर्नाटक सरकारने या प्रकरणात कोणतीही जबरदस्ती किंवा एकतर्फी निर्णय घेण्याचा प्रयत्न केला, तर आमचे सरकार आणि मुख्यमंत्री योग्य ती कायदेशीर व राजकीय कार्यवाही करण्यास पूर्णपणे सज्ज आहेत."
