पुण्यात वाहन क्रमांकात मोठा बदल; 'MH-12' मालिका संपण्याच्या मार्गावर

पुण्यातील वाहनांची 'MH-12' नंबर प्लेट मालिका लवकरच संपणार. पुणे आरटीओने पाठवला नव्या सिस्टीमचा प्रस्ताव.

पुणे : पुण्याची ओळख बनलेली वाहनांच्या नंबर प्लेटवरील 'MH-12' ही नोंदणी मालिका आता संपण्याच्या मार्गावर आहे. उपलब्ध वाहन नोंदणी क्रमांक जवळपास संपत आल्याने पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) नव्या नोंदणी पद्धतीचा प्रस्ताव राज्य परिवहन विभागाकडे पाठवला आहे. त्यामुळे लवकरच पुण्यात नोंदणी होणाऱ्या नवीन वाहनांच्या क्रमांकाच्या स्वरूपात मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

सध्या पुणे आरटीओकडून दुचाकी वाहनांसाठी 'ZY' आणि चारचाकी वाहनांसाठी 'ZW' ही मालिका सुरू आहे. आरटीओच्या नियमानुसार 'ZZ' पर्यंतची दोन अक्षरांची मालिका पूर्ण झाल्यानंतर विद्यमान क्रमांक देण्याची पद्धत संपुष्टात येणार आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दुचाकी वाहनांसाठी उपलब्ध क्रमांक पुढील काही दिवसांत संपण्याची शक्यता असून, चारचाकी वाहनांसाठीची मालिका आणखी सुमारे दोन महिने चालू शकते.

या पार्श्वभूमीवर आरटीओने राज्य परिवहन विभागाकडे दोन पर्याय सुचवले आहेत. पहिल्या पर्यायानुसार, वाहन क्रमांक MH-12-AAA-1234 अशा तीन अक्षरी स्वरूपात देण्यात येतील. मात्र, या लांब क्रमांकामुळे स्वयंचलित नंबर प्लेट ओळख प्रणाली, सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रगत वाहतूक व्यवस्थापन प्रणालीसमोर तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. लांब क्रमांक अचूकपणे वाचण्यात अडचण आल्यास वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करताना अडथळे निर्माण होऊ शकतात.

दुसऱ्या पर्यायात अक्षरे आणि अंक यांचे मिश्र स्वरूप असलेली नवीन अल्फान्यूमेरिक मालिका प्रस्तावित करण्यात आली आहे. हा प्रस्ताव राज्य परिवहन विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून, त्यावर अंतिम निर्णय होणे बाकी आहे. मात्र, या पद्धतीत अक्षरे आणि अंक एकत्र असल्याने नागरिक तसेच संबंधित यंत्रणेमध्ये काही प्रमाणात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

राज्य परिवहन विभाग या दोन्ही प्रस्तावांपैकी कोणत्या पर्यायाला मंजुरी देतो, यावर पुण्यातील वाहन नोंदणीची पुढील दिशा निश्चित होणार आहे. त्यामुळे पुण्याची ओळख असलेल्या 'MH-12' मालिकेनंतर वाहन क्रमांकाचे नवे स्वरूप काय असेल, याकडे वाहनधारक, वाहन विक्रेते आणि प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

'ड्रग्ज फ्री मुंबई' अभियानाची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात

Latest News

'ड्रग्ज फ्री मुंबई' अभियानाची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात 'ड्रग्ज फ्री मुंबई' अभियानाची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'ड्रग्ज फ्री मुंबई' अभियानाची सुरुवात. drugfreemumbai.org वर नशामुक्तीची शपथ घेऊन मिळवा प्रमाणपत्र.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय नव्या पत्त्यावर; एअर इंडिया इमारत बनणार राज्याचे नवे प्रशासकीय केंद्र
पुण्यात रिक्षा प्रवास महागण्याची शक्यता; पहिल्या दीड किमीसाठी २५ ऐवजी ३० रुपये प्रस्तावित
पुण्यात वाहन क्रमांकात मोठा बदल; 'MH-12' मालिका संपण्याच्या मार्गावर
दाऊदच्या ड्रग्स नेटवर्कवर ईडीचा मोठा प्रहार; सलीम डोलाच्या पंटरसह १० जणांविरोधात आरोपपत्र

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software