तपासाच्या नावाखाली पर्यटन; पुणे पोलिसांवर कठोर कारवाई

साताऱ्यात तपासाच्या नावाखाली कास पठारावर फिरणाऱ्या पुणे पोलिसांच्या महिला PSI सह ३ जणांची दोन वर्षांची वेतनवाढ रोखली.

पुणे:तपासाच्या नावाखाली अधिकृत कामाचा गैरवापर करून साताऱ्यात पर्यटनाचा आनंद घेतल्याप्रकरणी पुणे शहर पोलीस दलातील एका महिला पोलीस उपनिरीक्षकासह (PSI) तीन कर्मचाऱ्यांवर अत्यंत कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या या तिघांनी तपासादरम्यान गंभीर स्वरूपाचा हलगर्जीपणा केल्याचे विभागीय चौकशीत निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी संबंधित दोषी अधिकाऱ्यांच्या दोन वर्षांची वार्षिक वेतनवाढ (Annual Increment) रोखण्याचे आदेश दिले आहेत. या शिस्तभंगाच्या कारवाईमुळे पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, गतवर्षी ४ एप्रिल रोजी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या तपासासाठी सदर पोलीस पथक महिला फिर्यादीला सोबत घेऊन सातारा येथे गेले होते. नियमांनुसार साताऱ्यात पोहोचल्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्याला तपासाबाबत पूर्वकल्पना देणे आणि माहिती देणे आवश्यक होते. मात्र, त्याऐवजी या पोलिसांनी थेट एका प्रसिद्ध ‘कणसे ढाब्यावर’ जाऊन जेवणाचा आस्वाद घेतला. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता शाहूपुरी पोलीस ठाण्यात केवळ कागदी हजेरी लावून घटनास्थळाचा केवळ वरवरचा पंचनामा उरकला. विशेष म्हणजे, घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शी व्यक्तींकडे किंवा परिसरातील नागरिकांकडे कोणतीही सखोल चौकशी न करता तपास पूर्ण दाखवण्यात आला.

नियममानुसार पंचनामा आणि अहवाल तयार केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ पुण्याकडे परतणे अपेक्षित होते. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी तपासाचे कर्तव्य विसरून थेट प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या ‘कास पठार’ (Kas Plateau) आणि इतर प्रेक्षणीय स्थळांना भेटी देऊन पर्यटनाचा आनंद घेतला. विशेष म्हणजे, सोबत असलेल्या महिला फिर्यादीच्या घरी त्यांच्या आईची प्रकृती ठीक नसून त्या आजारी असल्याने आपल्याला लवकरात लवकर पुण्यात परत सोडण्याची विनंती फिर्यादीने वारंवार केली होती; परंतु या पोलीस पथकाने त्यांच्या विनंतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.

पर्यटन आटोपून रात्री उशिरा तब्बल ११ वाजता हे पथक पुण्यात परतले. एवढेच नव्हे तर, सुरक्षेची काळजी घेण्याऐवजी संबंधित महिला फिर्यादीला रात्रीच्या वेळी सुरक्षितपणे तिच्या घरी पोहोचवण्याबाबत टाळाटाळ करत त्यांना चक्क स्वारगेट बसस्थानकावर सोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. शेवटी फिर्यादीने पुन्हा विनंती केल्यानंतर त्यांना शनिवार पेठ पोलीस चौकीजवळ सोडून देण्यात आले.

या संपूर्ण प्रकारानंतर फिर्यादीने वरिष्ठांकडे तक्रार केली असता, या प्रकरणाची गंभीर दखն घेत विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले. चौकशीदरम्यान या तिन्ही कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्याने कर्तव्यात कसूर, बेशिस्तपणा, गंभीर निष्काळजीपणा आणि मनमानी केल्याचे सिद्ध झाले. पोलिसांच्या या बेजबाबदार वागणुकीमुळे जनमानसात पुणे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचे ताशेरे ओढत अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी तिन्ही दोषी कर्मचाऱ्यांच्या पुढील दोन वर्षांची वार्षिक वेतनवाढ रोखण्याची शिक्षा ठोठावली आहे. या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात एकच खाडबळ उडाली असून कर्तव्यात कसूर करणाऱ्यांसाठी हा एक मोठा इशारा मानला जात आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

'ड्रग्ज फ्री मुंबई' अभियानाची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात

Latest News

'ड्रग्ज फ्री मुंबई' अभियानाची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात 'ड्रग्ज फ्री मुंबई' अभियानाची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'ड्रग्ज फ्री मुंबई' अभियानाची सुरुवात. drugfreemumbai.org वर नशामुक्तीची शपथ घेऊन मिळवा प्रमाणपत्र.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय नव्या पत्त्यावर; एअर इंडिया इमारत बनणार राज्याचे नवे प्रशासकीय केंद्र
पुण्यात रिक्षा प्रवास महागण्याची शक्यता; पहिल्या दीड किमीसाठी २५ ऐवजी ३० रुपये प्रस्तावित
पुण्यात वाहन क्रमांकात मोठा बदल; 'MH-12' मालिका संपण्याच्या मार्गावर
दाऊदच्या ड्रग्स नेटवर्कवर ईडीचा मोठा प्रहार; सलीम डोलाच्या पंटरसह १० जणांविरोधात आरोपपत्र

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software