- Hindi News
- सातारा
- पदोन्नतीचा आनंद वृक्षदिंडी व वृक्षारोपणातून; सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक उत्तम शिंदे यांचा पर्यावरण संव...
पदोन्नतीचा आनंद वृक्षदिंडी व वृक्षारोपणातून; सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक उत्तम शिंदे यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश
मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उत्तम शिंदे यांनी पदोन्नतीनिमित्त पनवेल येथे वृक्षदिंडी व वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
दहिवडी : माण तालुक्यातील भांडवली (तेलदरा) येथील सुपुत्र तथा मुंबई पोलिस दलातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक उत्तम शिंदे यांची नुकतीच पदोन्नती झाली. या आनंदाचे औचित्य साधत त्यांनी वसुंधरा समृद्धी फाउंडेशनच्या सहकार्याने पनवेल येथील कळंबोली परिसरात भव्य वृक्षदिंडी आणि वृक्षारोपणाचा उपक्रम राबवला. या उपक्रमातून "झाडे लावा, झाडे जगवा – पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज" असा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात आला.
या पर्यावरणपूरक उपक्रमाला पनवेल महानगरपालिकेच्या उपमहापौर प्रमिला पाटील, स्थायी समितीचे अध्यक्ष बबन मुकादम, नगरसेविका सरस्वती काथारा व मोनिका महानवर, नगरसेवक तथा रायगड जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे, लातूर जिल्हा संपर्कप्रमुख श्रीनिवास क्षीरसागर, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे विशेष कार्य अधिकारी नारायण गोरे, लहू मलकमिर व जालिंदर डोके, भूमी अभिलेख अधिकारी उल्हास वाघमोडे, श्री संत सावता माळी समाज विकास मंडळ, कळंबोलीचे पदाधिकारी सुनील रासकर, शशिकांत गोरे, नितीन जाधव, ईश्वर जाधव तसेच धर्मवीर वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष सुखदेव सस्ते यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना उत्तम शिंदे यांनी माण-खटाव तालुक्यातील अल्प पर्जन्यमानाचा विचार करून या भागात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनाची व्यापक चळवळ उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. "माणदेश हिरवागार करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. शहरातील नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि दानशूर व्यक्तींनी वृक्षलागवडीसाठी आर्थिक तसेच सामाजिक सहकार्य करावे," असे आवाहन त्यांनी केले.
उपस्थित मान्यवरांनी या अभिनव आणि पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक करत माण-खटाव परिसर अधिक हिरवागार करण्यासाठी आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
