- Hindi News
- सातारा
- कोयना जलसागराची नवी ओळख; छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने नामकरण
कोयना जलसागराची नवी ओळख; छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने नामकरण
कोयना जलसागराचे अधिकृत नामांतर. राज्य शासनाकडून GR जारी; 'छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर' असे नवे नाव.
कराड:पश्चिम महाराष्ट्राच्या जलसिंचन, वीजनिर्मिती आणि पिण्याच्या पाणीपुरवठ्याचा मुख्य कणा असलेल्या कोयना जलसागराचे नामांतर करण्यात आले असून, यापुढे हा जलसागर ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ या नवीन आणि अभिमानास्पद नावाने ओळखला जाणार आहे. राज्य शासनाने घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयामुळे शिवप्रेमी आणि नागरिकांमधून प्रचंड समाधान व्यक्त केले जात आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंदर्भातील माहिती दिली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष मंजुरीनंतर जलसंपदा विभागाने अधिकृत शासन निर्णय (GR) जारी केला आहे.
कोयना धरण आणि त्याचा विस्तीर्ण जलसागर हा महाराष्ट्राच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाचा कणा मानला जातो. शेतीला पाणी पुरवण्यासोबतच राज्याला मोठ्या प्रमाणावर जलविद्युत निर्मिती करून देणारा हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. अशा या ऐतिहासिक जलसागराला रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे, अशी अनेक वर्षांची मागणी विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून लगातार केली जात होती. या लोकभावनांचा आणि ऐतिहासिक महत्त्वाची दखल घेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोयना जलसागराच्या नामांतराचा प्रस्ताव सादर केला होता.
या प्रस्तावावर अत्यंत सकारात्मकतेने विचार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नामांतराच्या प्रस्तावास मंजुरी दिली. त्यानंतर जलसंपदा विभागाने सर्व आवश्यक प्रशासकीय व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, त्यांची दूरदृष्टी आणि जलव्यवस्थापनाबाबतचे विचार आजही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत प्रेरणादायी आहेत. अशा महान नेतृत्वाच्या नावावरून राज्यातील सर्वात महत्त्वाच्या जलसागराला ओळख मिळणे ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे जलसंपदा मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे कोयना जलसागराचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधिक वाढले असून, राज्यभरातून या निर्णयाचे जोरदार स्वागत होत आहे.
