- Hindi News
- पुणे
- विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात; 15 विद्यार्थ्यांसोबत 4 शिक्षक जखमी
विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात; 15 विद्यार्थ्यांसोबत 4 शिक्षक जखमी
पुणे: राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले असून पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याण-नगर महामार्गावर गुरुवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास राज्य परिवहन मंडळाची बस रेलिंगला धडकली. या अपघातात अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील १५ विद्यार्थी आणि चार शिक्षक जखमी झाले आहेत.
पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस विद्यार्थी आणि शिक्षकांना शैक्षणिक सहलीसाठी घेऊन शिवनेरी किल्ल्याकडे जात होती. दरम्यान पुण्यापासून सुमारे ९५ किमी अंतरावर असलेल्या जुन्नर तालुक्यातील डुंबरवाडी गावाजवळ हा अपघात झाला. ओतूर पोलिसांनी बस चालकाविरुद्ध निष्काळजीपणे गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ओतूर पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, नेवासा तालुक्यातील पिंपरी शहाली गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सुमारे ५४ विद्यार्थी आणि काही शिक्षक बसने शैक्षणिक सहलीसाठी शिवनेरी किल्ल्यावर जात होते.
बस डंबरवाडी येथे पोहोचली तेव्हा चालकाचे बस वरील नियंत्रण सुटले आणि ती रेलिंगवर आदळली. धडकेमुळे बस बाजूला वळली आणि तिचा एक टायरही फुटला," अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अपघात होताच डुंबरवाडी आणि खामुंडी गावातील रहिवासी अपघातात अडकलेल्यांच्या मदतीसाठी घटनास्थळी धावले. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवले. गावकऱ्यांनी बसमधील प्रवाशांना चहा आणि नाश्ताही दिला. राज्य परिवहन मंडळाने नारायणगाव आगारातून तात्काळ दुसरी बसची व्यवस्था केली आणि उर्वरित लोकांना त्यांच्या गावी पाठवले. एमएसआरटीसीने जखमी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना १,००० रुपयांची तात्काळ मदतही केली. अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
