- Hindi News
- सातारा
- ग्रंथ निर्मिती ही कलेबरोबरच समाजाला एकत्र बांधणारी असावी - लेखक ऍड. शंकर निकम
ग्रंथ निर्मिती ही कलेबरोबरच समाजाला एकत्र बांधणारी असावी - लेखक ऍड. शंकर निकम
ग्रंथ निर्मिती ही कलेबरोबरच समाजाला एकत्र बांधणारी, समन्यायी भूमिका व्यक्त करणारी असावी असे विचार लेखक एड. शंकर निकम यांनी व्यक्त केले. ते ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सातारा येथील ग्रंथमित्र डॉ शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयातर्फे दरवर्षी *'ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण'* आणि *'सौ सुमन चव्हाण'* उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार दिले जातात.
समाज एकत्र ठेवण्यासाठी कालानुरूप काही रूढी परंपरा निर्माण होत असतात. परंतु त्या कालबाह्य झाल्यानंतर बदलल्या नाहीत तर समाज हा एका डबक्यात रूपांतरित होतो. तो व्हायचा नसेल तर आपल्या ‘वसुधैव कुटुंबकम’, ‘हे विश्वची माझे घर’ या मूलभूत भारतीय विचारांचा वारसा पुढे चालवला पाहिजे. आपला समाज संकुचित, विशिष्ट विचारसरणीत अडकवायचा नसेल तर सर्व लेखक, कवींनी त्यासाठी अभ्यासपूर्वक काळानुरुप लिहीतं झालं पाहिजे. पुरस्कार ज्यांच्या नावाने दिला जातो त्या डॉक्टर शिवाजीराव चव्हाण यांच्या कार्याबद्दलची माहिती होणेही तेवढेच महत्त्वाचे आहे आणि म्हणून प्रत्येक पुरस्कार प्राप्त लेखक, कवीने ते समजून घेणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.
डॉ शिवाजीराव चव्हाण यांचे साहित्य हे नवीन समाजासाठी आत्ताच्या लेखकांसाठी एक मार्गदर्शक लिखाण आहे"
या पुरस्कारांसाठी महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील ८६ लेखकांनी सहभाग नोंदवला. यापैकी नयन दिनेशराव पऱ्हाड, शिरजगाव यांच्या "जिवी जे गुंतले" (अभंग संग्रह) या पुस्तकास "ग्रंथमित्र डॉ.शिवाजीराव चव्हाण उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार" (रू. २५००/- आणि स्मृतिचिन्ह) प्राप्त झाला. तर "सौ.सुमन शिवाजीराव चव्हाण उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कारासाठी" (रू. २५००/- आणि स्मृतिचिन्ह) श्री. ऋषिकेश रोहिदास गोल्हार, टाकळी यांच्या "रानोबाचा माळ" या कादंबरीची निवड करण्यात आली.
उत्तेजनार्थ पुरस्कार वैशाली मंडपे, सातारा यांच्या सायबरनामा - आभासी जगातील आव्हाने आणि सुरक्षितता या पुस्तकास प्राप्त झाला.
यावेळी कु.साक्षी महामुलकर (प्राचीन सातारा), डॉ. सौ शामला माने (ज्येष्ठांच्या आयुष्यातील रंग मावळतीचे), श्री.राजेंद्र घाडगे (राजधुरंधर ताराराणी), अनिता आगाशे (लिंब आणि परिसर सांस्कृतिक परिचय),सौ. मनीषा शिरटावले (विसंवादाशी संवाद), सौ.अश्विनी कोठावळे ( अंतर्नाद), श्री.काशिनाथ गायकवाड (महापुरुषांच्या वलयात) या लेखकांचाही यावेळी विशेष गौरव करण्यात आला.
पुरस्कारासाठी आलेल्या ग्रंथांचे परीक्षण सौ.कल्पना चौधरी , सौ.नंदा जाधव, सुनिता कदम यांनी केले.
पुरस्कारप्राप्त लेखक आणि प्रकाशक यांचे ग्रंथमित्र डॉ शिवाजीराव चव्हाण सार्वजनिक ग्रंथालयाचे तर्फे अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. राजेंद्र माने यांनी भूषविले.कार्यक्रमाचे प्रास्तविक सुनिता कदम यांनी केले. सूत्रसंचालन स्मिता पोरे यांनी केले तर आभार प्रमोदीनी मंडपे यांनी मानले.
