- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज: अद्वितीय शौर्य आणि धर्मासाठी दिलेले महान बलिदान
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज: अद्वितीय शौर्य आणि धर्मासाठी दिलेले महान बलिदान
मराठा साम्राज्याच्या इतिहासात अद्वितीय शौर्य, पराक्रम, धैर्य आणि धर्मनिष्ठेचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन हा महाराष्ट्रासाठी अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी दिवस आहे. दरवर्षी ११ मार्च रोजी त्यांच्या बलिदानानिमित्त श्रद्धा आणि अभिमानाने त्यांना अभिवादन केले जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र असलेल्या संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ला येथे झाला. संभाजी महाराजांचे बालपण अत्यंत संघर्षमय होते. संभाजी महाराज लहान असतानाच त्यांच्या आई सईबाई यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांचे संगोपन आजी जिजाबाई यांच्या संस्कारामध्ये झाले. त्यामुळे त्यांच्यामध्ये स्वराज्य, धर्म आणि शौर्याची जाणीव बालपणापासूनच निर्माण झाली. त्यांनी लहानपणापासूनच युद्धकला, राजकारणासोबत मराठी, हिंदी फारसी, संस्कृत भाषांचे शिक्षण घेतले होते. त्यांनी संस्कृत भाषेत 'बुधभूषण' हा ग्रंथ लिहिला. यामध्ये राजकारण नीती आणि समाज व्यवस्थेवरील विचार मांडलेले आहेत. यावरून ते केवळ पराक्रमी योद्धा नव्हते तर विद्वान आणि दूरदृष्टी असलेले शासकही होते.
१६८० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची धुरा सांभाळली. १६८१ साली ते मराठा साम्राज्याच्या गादीवर विराजमान झाले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी मुघल सम्राट औरंगजेब यांच्या प्रचंड सैन्याशी कठोर संघर्ष केला. औरंगजेबाने मराठा साम्राज्य नष्ट करण्यासाठी दक्षिणेत प्रचंड मोहीम सुरू केली होती परंतु संभाजी महाराजांनी त्याला कडवी झुंज दिली. जवळपास नऊ वर्ष त्यांनी मुघल, सिद्दी, पोर्तुगीज आणि इतर शत्रू विरुद्ध सतत लढा दिला आणि स्वराज्याचे रक्षण केले. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मराठा साम्राज्य अधिक बळकट झाले. त्यांनी अनेक मोहिमा राबवून शत्रूंना पराभूत केले. त्यांच्या नेतृत्वामुळे मराठा सैन्याची ताकद आणि आत्मविश्वास वाढला त्यांनी स्वराज्यच्या सीमा टिकून ठेवण्यासाठी अथक प्रयत्न केले. १६८९ साली संगमेश्वर येथे संभाजी महाराज आणि त्यांचे विश्वासू सहकारी कवी कलश यांना मुगल सैन्याने कपटाने पकडले. औरंगजेबाने त्यांना धर्मांतर करण्याचा दबाव टाकला परंतु संभाजी महाराजांनी धर्म आणि स्वाभिमानासाठी मृत्यू स्वीकारण्याचा निर्णय घेतला. अनेक दिवस मुघलांनी त्यांना भयानक यातना दिल्या. त्यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले परंतु त्यांनी शेवटपर्यंत धर्म आणि स्वाभिमानाचा त्याग केला नाही. अखेर ११ मार्च १६८९ रोजी तुळापूर येथे त्यांची क्रूर हत्या करण्यात आली. हे बलिदान इतिहासातील अद्वितीय उदाहरण मानले जाते.
धर्म, स्वाभिमान आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी दिलेले. हे बलिदान मराठा इतिहासातील एक प्रेरणादायी अध्याय आहे. आजही महाराष्ट्रातील जनता त्यांना 'धर्मवीर' संभाजी महाराज म्हणून अभिमानाने स्मरते. धर्मवीर संभाजी महाराजांचे शौर्य, त्याग आणि बलिदान पुढील पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील.
सोडावा धर्म की, सोडवा प्राण
ऐसा प्रश्न कधी ना पडावा
सोडावा प्राण पण धर्म ना सोडावा
शंभूराजांचा त्याग सदैव आठवावा....
नूतन विनायक भिसे
