- Hindi News
- पुणे
- पुण्यातील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाला धमकीचा ई-मेल; सुरक्षा यंत्रणा सतर्क, तपास सुरू
पुण्यातील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाला धमकीचा ई-मेल; सुरक्षा यंत्रणा सतर्क, तपास सुरू
पुणे:
पुण्यातील पाषाण येथील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाला स्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने बुधवारी सकाळी काही काळ खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत कार्यालयाची सखोल तपासणी केली. मात्र, तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकीचा ई-मेल मिळाल्यानंतर सुरक्षा नियमांनुसार तातडीने सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या. नागरिकांच्या सुरक्षिततेला कोणताही धोका निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित ई-मेलमध्ये पासपोर्ट कार्यालयाला लक्ष्य करण्याचा इशारा देण्यात आला होता. या संदेशातील काही मजकूर तमिळ भाषेत असल्याचेही तपासात समोर आले आहे. त्यामुळे ई-मेल नेमका कुठून पाठविण्यात आला, याचा शोध घेण्यासाठी पोलिस आणि संबंधित यंत्रणांनी तपास सुरू केला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे काही काळ कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करत संपूर्ण परिसराची पाहणी केली असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
