- Hindi News
- सातारा
- "महावितरणच्या हलगर्जीपणाचा दुहेरी बळी; विजेच्या धक्क्याने आजी-नातवाचा जागीच मृत्यू"
"महावितरणच्या हलगर्जीपणाचा दुहेरी बळी; विजेच्या धक्क्याने आजी-नातवाचा जागीच मृत्यू"
By Nutan Bhise
On
दहिवडी प्रतिनिधी: माण तालुक्यातील मार्डी गावात विजेच्या खुल्या आणि तुटलेल्या तारेचा तीव्र धक्का लागल्याने आजी आणि नातवाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मालन विलास काळे (वय ६०) आणि सुजित ऊर्फ सुमित युवराज काळे (वय १३) अशी मृत झालेल्या आजी-नातवाची नावे आहेत. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे दोन निरपराध जीवांना आपला प्राण गमवावा लागल्याने मार्डी गावावर शोककळा पसरली असून ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मालन काळे या आपल्या नातवासह शेतात शेळ्या चारण्यासाठी गेल्या होत्या. त्याच वेळी अचानक पाऊस सुरू झाला. पावसाने शेळ्यांची पळापळ सुरू झाली असता, त्यातील एक शेळी शेतातील लिंबाच्या झाडाजवळून गेलेल्या महावितरणच्या तुटलेल्या तारेत अडकली. पाऊस पडल्यामुळे जमीन पूर्णपणे ओली झाली होती आणि झाडात अडकलेल्या तारेमधील विद्युत प्रवाह (अर्थिंग) जमिनीत उतरला होता. विजेचा धक्का लागून शेळी तडफडू लागल्याचे पाहून १३ वर्षांचा चिमुरडा सुजित तिला वाचवण्यासाठी पुढे गेला, मात्र त्यालाही विजेचा जोरदार धक्का बसला. आपला नातू तडफडत असल्याचे पाहून आजी मालन काळे या त्याला वाचवण्यासाठी धावल्या. परंतु, विद्युत प्रवाह इतका तीव्र होता की, नातवाला वाचवण्याच्या प्रयत्नात आजीलाही विजेचा भीषण धक्का लागला. या दुर्घटनेत आजी, नातू आणि शेळी या तिघांचाही जागीच मृत्यू झाला. मृत्यूनंतरही नातवाचा हात आजीच्या हातातच अडकलेला होता, हे मन हेलावून टाकणारे दृश्य पाहून घटनास्थळावरील उपस्थित ग्रामस्थांचे डोळे पानावले होते.
ग्रामस्थांचा महावितरणवर तीव्र संताप
घटनास्थळावरील ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, ही विद्युत तार गेल्या १५ ते २० दिवसांपूर्वीच तुटून खाली पडली होती. पावसाळ्याचे दिवस असल्याने कोणतीही मोठी दुर्घटना घडू शकते, हे ओळखून स्थानिक शेतकऱ्यांनी महावितरणच्या संबंधित वायरमनला वारंवार फोन करून आणि तोंडी सांगून तार ओढण्याची व दुरुस्त करण्याची विनंती केली होती. मात्र, वायरमनने या गंभीर समस्येकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. महावितरणच्या याच हलगर्जीपणामुळे आज आजी-नातवाचा बळी गेल्याचा थेट आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
दोषींवर कायदेशीर कारवाई करणार: शाखा अभियंता
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि महावितरणचे शाखा अभियंता तुशार यांनी घटनास्थळाला भेट दिली. यावेळी शाखा अभियंत्यांनी ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जात, हा अपघात विजेचा धक्का लागूनच झाल्याचे मान्य केले. "या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर यांच्यामार्फत सखोल चौकशी केली जाईल. शेतकऱ्यांचे व ग्रामस्थांचे जबाब घेतले जातील आणि अहवालानुसार महावितरणच्या ज्या कर्मचाऱ्याची किंवा अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित होईल, त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल," असे आश्वासन त्यांनी दिले.
दरम्यान, विद्युत निरीक्षकांच्या पाहणीनंतरच पुढील तांत्रिक पंचनामा केला जाणार असून, तोपर्यंत संबंधित डीपीचा वीजपुरवठा खंडित ठेवण्यात आला आहे. एकाच कुटुंबातील दोघांचा अशा रीतीने अंत झाल्याने मार्डी गावामध्ये मोठी हळहळ व्यक्त होत असून दोषींवर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे..
Edited By: Nutan Bhise
खबरें और भी हैं
Latest News
25 Jun 2026 12:04:49
दहिवडी प्रतिनिधी: माण तालुक्यातील मार्डी गावात विजेच्या खुल्या आणि तुटलेल्या तारेचा तीव्र धक्का लागल्याने आजी आणि नातवाचा जागीच दुर्दैवी मृत्यू...
