- Hindi News
- पुणे
- विमाननगरमध्ये भररस्त्यात हप्ता न दिल्याने चायनीज सेंटरच्या स्वयंपाक्यावर जीवघेणा हल्ला; दोघांना अटक
विमाननगरमध्ये भररस्त्यात हप्ता न दिल्याने चायनीज सेंटरच्या स्वयंपाक्यावर जीवघेणा हल्ला; दोघांना अटक
पुणे: पुण्यातील विमाननगर भागात एका प्रसिद्ध चायनीज सेंटरवर महिन्याला ५ हजार रुपयांची खंडणी (हप्ता) मागून, ती न दिल्याने एका २७ वर्षीय स्वयंपाक्यावर धारदार चाकू आणि लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी युवक (वय २७, मूळ रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. रामवाडी, पुणे) हा विमाननगर येथील ‘इंडियन एस चायनीज सेंटर’वर स्वयंपाकी म्हणून काम करतो. २ जुलै २०२६ रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास आरोपी या चायनीज सेंटरवर आले. त्यांनी "इथे धंदा करायचा असेल तर महिन्याला ५ हजार रुपये हप्ता द्यावा लागेल" अशी धमकी दिली. फिर्यादीने नकार दिला असता, आरोपींनी जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या हातावर चाकूने वार केले आणि लाकडी दांडक्याने डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी केले.
या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात सोहेल सलीम कनुल (वय २४, रा. संजय पार्क, विमाननगर) आणि आर्यन धर्मपाल ढोबळे (वय २०, रा. बोपखेल, पुणे) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९(१), ३०८(३), ३०८(४), आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास विमानतळ पोलीस करत आहेत.
