- Hindi News
- पुणे
- पुण्यात ऑनलाईन ई-सिगारेट आणि हुक्का फ्लेवर विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; विमानतळ पोलिसांची मोठी कारवाई
पुण्यात ऑनलाईन ई-सिगारेट आणि हुक्का फ्लेवर विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; विमानतळ पोलिसांची मोठी कारवाई
पुणे: पुणे शहरातील विमाननगर आणि मोहम्मदवाडी परिसरात ऑनलाईन पद्धतीने बेकायदेशीरपणे प्रतिबंधित ई-सिगारेट व हुक्का फ्लेवरची विक्री करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा विमानतळ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून तब्बल १ लाख ४२ हजार ६९० रुपये किमतीचे प्रतिबंधित हुक्का फ्लेवर, ई-सिगारेट आणि संबंधित साहित्य जप्त केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, असद चांदमिया बरभैया (वय ३१ वर्ष, रा. बैगदीनगर, कोंढवा, पुणे) आणि विकास रमेश बागुल (वय ३३ वर्ष, रा. मोहम्मदवाडी, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत ऑनलाईन पद्धतीने या प्रतिबंधित वस्तूंची बेकायदेशीर विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस अंमलदार हरीप्रसाद पुंडे यांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक नितीन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ३० जून २०२६ रोजी एका बनावट ग्राहकामार्फत ऑनलाईन हुक्का फ्लेवरची ऑर्डर देऊन सापळा रचला. विमाननगर येथील सीसीडी चौक, कोनार्कनगर सोसायटीजवळ पोर्टर ॲपद्वारे डिलिव्हरी देण्यासाठी आलेल्या इसमाला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्या जवळील पार्सलची झडती घेतली असता, त्यात १८ हजार ३२० रुपये किमतीचे प्रतिबंधित हुक्का फ्लेवर आढळून आले. या पोर्टर डिलिव्हरी बॉयकडे कसून चौकशी केली असता, त्याने हे पार्सल कुठून आणले याचा सुगावा लागला. पोलिसांनी तात्काळ मोहम्मदवाडी येथील एनआयबीएम रोडवरील एचडीएफसी बँक शेजारी असलेल्या हिल्स अँड डेल्स येथील 'शिशा कॉर्नर' (शॉप नंबर ५, कड नगरचौक) या दुकानावर छापा टाकला.
या छाप्यादरम्यान पोलिसांनी दुकान चालवणाऱ्या असद बरभैया आणि विकास बागुल यांना रंगेहात पकडले. दुकानाची सखोल झडती घेतली असता, तेथे १ लाख २४ हजार ३७० रुपये किमतीचे प्रतिबंधित हुक्का फ्लेवर, ई-सिगारेट आणि इतर बेकायदेशीर साहित्य साठवून ठेवल्याचे उघड झाले. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला असून दोन्ही आरोपींविरुद्ध विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. ३१७/२०२६ नुसार इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंधक अधिनियम २०१९ चे कलम ७ व ८ आणि सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम (COTPA) २००३ व २००४ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही यशस्वी कारवाई अप्पर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) श्री. मनोज पाटील, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-०७) श्री. अबिनाश कुमार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) महेश बोलके, पीएसआय नितीन राठोड आणि त्यांच्या पथकातील हरीप्रसाद पुंडे, लालु कन्हे, राहुल जोशी, रुपेश पिसाळ, योगेश थोपटे, सचिन मांजरे, अंबादास चव्हाण, दिगंबर गोरे, राजीव टोंम्पे, प्रशांत सुतार, अंकुश जोगदंडे, आशा धादवड व सना शेख यांनी केली आहे.
