- Hindi News
- सातारा
- बिदालमध्ये अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा; तरुणाविरुद्ध गुन्हा, देशी दारूच्या १२ बाटल्या जप्त
बिदालमध्ये अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा; तरुणाविरुद्ध गुन्हा, देशी दारूच्या १२ बाटल्या जप्त
दहिवडी :
माण तालुक्यातील बिदाल गावात सुरू असलेल्या अवैध देशी दारू विक्रीवर दहिवडी पोलिसांनी छापा टाकत एका तरुणाविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत देशी दारूच्या १२ सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या असून, आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १४ जुलै रोजी दुपारी सुमारे १.४५ वाजता बिदाल येथील एस.टी. स्थानकाजवळील एका बंद पत्र्याच्या शेडमागे बेकायदेशीर दारूची विक्री सुरू असल्याची माहिती दहिवडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून कारवाई केली.
या कारवाईदरम्यान कुणाल शरद दीक्षित (वय १९, रा. बिदाल, ता. माण, जि. सातारा) हा कोणताही परवाना नसताना देशी दारूची विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून 'देशी दारू खास संत्रा' या ब्रँडच्या १२ सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे ६०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई महेंद्र गणपत खाडे यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली असून, त्यानुसार आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) २०२३ मधील कलम ३५(३) अंतर्गत आरोपीला नोटीस बजावण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पोमण यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असून, पुढील तपास दहिवडी पोलीस करीत आहेत.
