- Hindi News
- सातारा
- कोविड काळात पॅरोलवर सुटला अन् थेट ४ वर्ष गायब झाला; कोल्हापूर जेलमधील 'त्या' अट्टल गुन्हेगाराला सात...
कोविड काळात पॅरोलवर सुटला अन् थेट ४ वर्ष गायब झाला; कोल्हापूर जेलमधील 'त्या' अट्टल गुन्हेगाराला सातारा एलसीबीने कसे पकडले?
सातारा: कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातून पॅरोल (अभिवचन) रजेवर बाहेर पडल्यानंतर तब्बल चार वर्षांपासून पोलिसांना चकमा देऊन वेशांतर करत फिरणाऱ्या एका अट्टल फरार कैद्याला सातारा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अखेर जेरबंद केले आहे. भरत कांतीलाल ओसवाल (रा. गुलमोहोर कॉलनी, शाहूपूरी, सातारा) असे अटक करण्यात आलेल्या फरार कैद्याचे नाव आहे. ओसवाल हा शाहूपूरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका पत्नीच्या खुनाच्या (IPC ३०२, ४९८ अ) गुन्ह्यामध्ये कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत होता.
असा झाला होता फरार; कोविडचा घेतला फायदा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत ओसवाल हा १४ मे २०२० रोजी कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातून ४५ दिवसांच्या पॅरोल रजेवर बाहेर आला होता. त्यानंतर देशात आणि राज्यात कोरोनाचे संकट आल्यामुळे त्याने कोविड परिस्थितीचा गैरफायदा घेत टप्प्याटप्प्याने आपली रजा वाढवून घेतली. नियमानुसार रजेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याने १९ मे २०२२ रोजी कोल्हापूर कारागृहात हजर होणे अत्यंत आवश्यक होते. मात्र, रजेची मुदत संपली, महिने उलटले, तरीही ओसवाल जेलमध्ये परतलाच नाही. तो पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला. याप्रकरणी कोल्हापूर कळंबा कारागृहाचे शिपाई मुकुंद अशोक कापरे यांच्या फिर्यादीवरून शाहूपूरी पोलीस ठाण्यात ओसवालविरुद्ध कलम १७२ आणि २२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वेशांतर करून बदलायचा ठिकाणे, पोलिसांसमोर होते मोठे आव्हान कारागृह प्रशासनाने भरत ओसवाल याला अधिकृतपणे 'फरारी' घोषित केल्यानंतर सातारा एलसीबीचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक तयार करण्यात आले. ओसवाल अत्यंत हुशार होता, त्याला आपल्या नातेवाईकांची आणि जुन्या मित्रांची चांगली माहिती होती. त्यामुळे तो सातत्याने आपली ओळख लपवून, वेशांतर करून वेगवेगळ्या शहरांमध्ये आपले ठिकाण बदलत होता. एलसीबीच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करून त्याच्या जुन्या संपर्कांवर आणि नातेवाईकांवर बारीक लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. दरम्यान, तो अधूनमधून वेगवेगळ्या अनोळखी नंबरवरून आपल्या काही जवळच्या व्यक्तींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आणि पोलीस त्याच्या मागावर होते.
शाहूपूरी चौकात रचला सापळा आणि आवळल्या बेड्या १ जुलै २०२६ रोजी पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून पक्की माहिती मिळाली की, फरार कैदी भरत ओसवाल हा सध्या सातारा शहरातील शाहूपूरी चौकात वेशांतर करून उभा आहे. माहिती मिळताच एलसीबीच्या पथकाने कोणतीही वेळ न घालवता शाहूपूरी चौकात धाव घेतली आणि परिसराला वेढा घातला. पोलिसांनी अत्यंत शिताफीने ओसवालला जागेवरच ताब्यात घेतले. त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी शाहूपूरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, लवकरच त्याची रवानगी पुन्हा कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात केली जाणार आहे.
सदरची धडक कारवाई सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडूकर यांच्या थेट मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, प्रवीण फडतरे, अविनाश चव्हाण, सुजित भोसले, पृथ्वी जाधव, रोहित निकम आणि महेश निर्मळ यांच्या पथकाने केली आहे. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी संपूर्ण पथकाचे विशेष कौतुक केले आहे.
