- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- नेपाळच्या संकटातून खानदेशातील २५० भाविक थोडक्यात बचावले; सर्वजण सुखरूप
नेपाळच्या संकटातून खानदेशातील २५० भाविक थोडक्यात बचावले; सर्वजण सुखरूप
नेपाळमधील नैसर्गिक संकटातून जळगाव, धुळे, नाशिक, पुण्यातील २५० भाविक बालंबाल बचावले. सर्वजण सुरक्षित असून भारताकडे परतत आहेत.
जळगाव : नेपाळमध्ये अचानक निर्माण झालेल्या भीषण नैसर्गिक संकटाच्या पार्श्वभूमीवर खानदेशातील सुमारे २५० भाविक सुखरूप असल्याची दिलासा दायक माहिती समोर आली आहे. मालेगाव, नाशिक, धुळे, अमळनेर, पुणे आणि मुंबईसह विविध भागांतून धार्मिक यात्रेसाठी नेपाळला गेलेले हे भाविक सध्या सुरक्षित असून, मायदेशी परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. संकटग्रस्त परिसरातून अवघ्या काही तास आधी बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळल्याचे सांगण्यात येत आहे.
औदुंबर भक्त मंडळाच्या माध्यमातून ‘माँ गायत्री यात्रा’ कंपनीने आयोजित केलेल्या या यात्रेसाठी पाच खासगी बसमधून भाविक नेपाळला रवाना झाले होते. यात्रेत महिला, पुरुष तसेच विविध वयोगटातील नागरिक सहभागी झाले होते. नेपाळमधील धार्मिक आणि पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे नियोजन करण्यात आले होते.
यात्रे दरम्यान नेपाळमध्ये हवामान अचानक बिघडले आणि काही भागात गंभीर परिस्थिती निर्माण झाली. विशेष म्हणजे, संकट निर्माण झालेल्या परिसरात हे भाविक काही तास आधीच उपस्थित होते. त्यांनी तेथे एकत्र भोजन केले होते. भोजन झाल्यानंतर नियोजित कार्यक्रमा नुसार भाविक पुढील ठिकाणी रवाना झाले. त्यानंतर काही तासांतच त्याच परिसरात परिस्थिती गंभीर बनली.
वेळीच तेथून बाहेर पडल्याने मोठा धोका टळल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली आहे. काही वेळ आणखी तेथे थांबले असते तर परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकली असती, असेही त्यांनी सांगितले. या घटनेमुळे यात्रेतील नागरिकांना मोठा धक्का बसला असून, हा अनुभव कायम स्मरणात राहील, अशी प्रतिक्रिया काही भाविकांनी दिली.
दरम्यान,नेपाळमध्ये संकटाची माहिती समोर आल्यानंतर भारतातील भाविकांच्या कुटुंबीयांमध्ये चिंता वाढली होती. आपल्या नातेवाइकांशी संपर्क साधण्यासाठी अनेकांनी प्रयत्न सुरू केले. मात्र, सर्व २५० भाविक सुरक्षित असल्याचे समजल्यानंतर कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला.
सध्या सर्व भाविक सुरक्षितपणे नेपाळमधून बाहेर पडून भारताकडे परतत आहेत. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठी दुर्घटना न घडता खानदेशातील सर्व भाविक सुखरूप असल्याने त्यांच्या कुटुंबीयांसह नागरिकांमध्ये मोठा दिलासा व्यक्त होत आहे.
