- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- अमित शाह-एकनाथ शिंदेंची विमानतळावर १० मिनिटे चर्चा; राजकीय चर्चांना उधाण
अमित शाह-एकनाथ शिंदेंची विमानतळावर १० मिनिटे चर्चा; राजकीय चर्चांना उधाण
मुंबई विमानतळावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात १० मिनिटे गुप्त चर्चा. महायुतीतील समन्वयाबाबत महत्त्वाचे मंथन.
मुंबई: राजकीय वर्तुळातून एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. एका कौटुंबिक व खासगी कार्यक्रमाच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आले होते. मुंबई विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अमित शाह यांना राखी बांधल्यानंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात विमानतळावर तब्बल दहा मिनिटे एकांतात विशेष चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या गुप्त भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या दहा मिनिटांच्या एकांतात बैठकीत प्रामुख्याने राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी आणि महायुती मधील समन्वया बाबत सविस्तर चर्चा झाली. अलीकडच्या काळात राज्यातील काही महत्त्वाच्या निर्णयांवरून आणि विशेषतः रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मराठी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यावरून शिवसेना मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा रंगली होती. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी १५ ऑगस्ट पर्यंतची मुदत दिली होती आणि मुदत संपल्यानंतर कारवाईला सुरुवातही झाली होती. मात्र, त्यानंतर राज्य शासनाकडून रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी आणखी एका वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. या संपूर्ण प्रकरणावरून आणि इतर राजकीय समीकरणांमुळे शिवसेनेत अंतर्गत अस्वस्थता व नाराजी असल्याचे बोलले जात होते.
अशा पार्श्वभूमीवर अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात झालेली ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. विमानतळावरील या चर्चे दरम्यान शिवसेना मंत्र्यांमधील असंतोष आणि इतर राजकीय मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये खुली चर्चा झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या सर्व घडामोडींवर चर्चा झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पूर्ण आश्वस्त करत "कोणतीही चिंता करू नका," असे धीराचे शब्द दिल्याची माहिती समोर येत आहे. महायुतीमधील पक्षांमधील सुसंवाद टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने आणि आगामी राजकीय रणनीतीच्या अनुषंगाने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळातील उत्सुकता आणखीनच वाढली आहे.
