छत्रपती संभाजीनगर मध्ये १२,९४४ कोटींची गुंतवणूक; २१ हजारांहून अधिक रोजगारांची संधी

छत्रपती संभाजीनगर जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत १२,९४४ कोटींचे २३२ सामंजस्य करार. २१,३०६ नवीन रोजगारांची निर्मिती होणार.

छत्रपती संभाजीनगर: औद्योगिक विकासाला अधिक गती देण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद २०२६’ मध्ये विक्रमी उलाढाल पाहायला मिळाली आहे. हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे पार पडलेल्या या महत्त्वाच्या परिषदेत तब्बल २३२ उद्योगांसोबत १२ हजार ९४४ कोटी रुपयांचे विक्रमी सामंजस्य करार (MoUs) संपन्न झाले. या मोठ्या गुंतवणुकीमुळे जिल्ह्यात आगामी काळात २१ हजार ३०६ हून अधिक नव्या रोजगारांची निर्मिती होणार असल्याची अधिकृत माहिती जिल्हा उद्योग केंद्रातर्फे देण्यात आली आहे.

      सामाजिक न्याय तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेला उद्योजकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी बोलताना पालकमंत्री शिरसाट यांनी, उद्योजकांच्या जिद्दीला आणि त्यांच्या पंखाना बळ देण्याचे काम शासन प्रामाणिकपणे करेल, असा विश्वास व्यक्त केला. लहान पुरवठादार, मध्यम उद्योजक ते थेट मोठ्या उद्योगांपर्यंतची संपूर्ण औद्योगिक साखळी मजबूत करण्यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये जमिनीची वाढती मागणी लक्षात घेता, आज सामंजस्य करार केलेल्या नवीन उद्योगांना जागेच्या वाटपात प्राधान्य दिले जाईल, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

      छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उद्योगासाठी अत्यंत अनुकूल आणि पोषक वातावरण असल्याचे नमूद करत, इमाव बहुजन कल्याण तथा नवीनीकरण ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी भविष्यात या जिल्ह्याला जागतिक पातळीवर एक प्रमुख इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) निर्मितीचे हब म्हणून नावारूपाला आणू, असा दूरगामी संकल्प व्यक्त केला. जिल्ह्यात उद्योग क्षेत्रातील वाढती गुंतवणूक पाहता दळणवळण व्यवस्था, सुरळीत वीज पुरवठा आणि समन्वय केंद्र यांसारख्या अत्यावश्यक पायाभूत सुविधांची कामे आधीच मार्गी लावली आहेत. व्यवसाय सुलभता (Ease of Doing Business) वाढवण्यासाठी आणि उद्योजकांना सर्वतोपरी साहाय्य करण्यासाठी प्रशासन नेहमी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

       उद्योगांच्या गतिमान वाढीसाठी आणि औद्योगिक विस्ताराकरिता शासन धोरणा नुसार जिल्हा प्रशासन पूर्ण तत्परतेने काम करत आहे. औद्योगिक विस्तारासाठी आवश्यक असलेली भूसंपादन प्रक्रिया सध्या विविध टप्प्यांवर वेगाने सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दिली. या परिषदेच्या प्रास्ताविकात विभागीय सह आयुक्त (उद्योग) स्वप्नील राठोड यांनी उद्योगांच्या वाढीला मिळणाऱ्या या प्रोत्हाना बाबत माहिती दिली, तर सूत्रसंचालन प्रविणा कन्नडकर यांनी केले. या परिषदेत मोठ्या संख्येने सहभागी झालेले उद्योजक आणि झालेली भरभक्कम गुंतवणूक यामुळे मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाला एक नवे व बळकट सामर्थ्य प्राप्त होणार असल्याची चर्चा यानिमित्ताने रंगली आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

व्यासपीठ शुद्धीकरण प्रकरणावरून राहुल गांधींचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software