- Hindi News
- सातारा
- साताऱ्यात ‘पेपर ब्लास्ट’विरोधात पालिका आक्रमक; प्लॅस्टिक युक्त कचऱ्यावर दंडात्मक कारवाई
साताऱ्यात ‘पेपर ब्लास्ट’विरोधात पालिका आक्रमक; प्लॅस्टिक युक्त कचऱ्यावर दंडात्मक कारवाई
साताऱ्यात गणेशोत्सवात 'पेपर ब्लास्ट'मुळे पसरणाऱ्या प्लॅस्टिक कचऱ्यावर पालिकेची कारवाई. १० हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आणि विशेष पथके तैनात.
सातारा: गणेशोत्सवाच्या आगमनानिमित्त काढल्या जाणाऱ्या मिरवणुकांमध्ये अलीकडच्या काळात वेगाने रुढ झालेला ‘पेपर ब्लास्ट’चा (Paper Blast) ट्रेण्ड सातारा शहरातील स्वच्छतेसमोर आणि प्रशासना समोर एक मोठे आव्हान उभे करत असल्याचे समोर आले आहे. लाडक्या बाप्पाच्या स्वागताचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उडवले जाणारे रंगीबेरंगी कागद आणि त्यात प्रामुख्याने असणारे प्लॅस्टिकयुक्त फॉइल कोटिंगचे घटक संपूर्ण रस्त्यांवर पसरत असल्याने सातारा नगरपालिकेची चिंता वाढली आहे. या गंभीर प्रकारामुळे शहराचे सौंदर्य आणि आरोग्य धोक्यात येत असून, प्रशासनाने आता यावर कडक नियंत्रण आणत कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्याचे संकेत दिले आहेत.
शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून बाप्पाला मोठ्या जल्लोषात आणि वाजत-गाजत मंडपात आणण्याची जय्यत तयारी केली जात आहे. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर निघणाऱ्या या आगमन सोहळ्यांमध्ये अनेक ठिकाणी आधुनिक ‘पेपर ब्लास्ट’ तोफांचा वापर केला जात असल्याचे चित्र आहे. विशेषतः गणपती कारखान्यांच्या परिसरात आणि शहरातील प्रमुख चौकांमध्ये हा ट्रेण्ड मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. तोफांमधून आकाशात उडवले जाणारे हे कागद साधे नसून ते प्रामुख्याने प्लॅस्टिक किंवा फॉइल कोटिंगचे असतात. हे चकाकणारे प्लॅस्टिकचे तुकडे ओल्या रस्त्यांवर, झाडांवर आणि वाहनांवर अतिशय घट्ट चिकटून बसतात. उत्सव संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रस्ते स्वच्छ करताना पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. साधा कागद काही वेळाने नष्ट होतो किंवा सहज गोळा करता येतो, मात्र हे प्लॅस्टिकचे कस्पट साध्या झाडूने निघत नसल्याने कर्मचाऱ्यांना हाताने वेचून काढावे लागते, ज्यामुळे त्यांच्यावरील कामाचा ताण कैक पटीने वाढतो.
या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेत सातारा पालिकेचे आरोग्य विभागप्रमुख राकेश गलियल यांनी स्पष्ट केले आहे की, शहरात कचरा पसरवणाऱ्या आणि विशेषतः प्लॅस्टिकचा कचरा निर्माण करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल. अशा प्रकारे पर्यावरणाला आणि स्वच्छतेला मारक ठरणारे कृत्य करणाऱ्यांना दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्याची तरतूद कायद्यात असून, यावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथकेही नेमली जाणार आहेत. गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीचा आणि पर्यावरणाचा समतोल राखणारा पवित्र सण आहे, त्यामुळे तात्पुरत्या आनंदासाठी सार्वजनिक ठिकाणी कचरा पसरवणे योग्य नाही, असे मत पालिकेच्या आरोग्य समितीचे सभापती धनंजय जांभळे यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत आणि औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ अंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
बाप्पाचे स्वागत धुम धडाक्यात व उत्साहात व्हावे, परंतु त्यामुळे शहराचे आरोग्य आणि स्वच्छता धोक्यात येणार नाही, याची जबाबदारी आता शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळे आणि नागरिकांनी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
