विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या संगोपनावर अदिती तटकरे यांचा भर

स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबत मानसिक आरोग्य जपले पाहिजे. मुंबईतील कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचे आवाहन.

मुंबई: आजच्या बदलत्या आणि अटीतटीच्या स्पर्धात्मक युगात केवळ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे लक्ष देऊन चालणार नाही, तर त्यांच्या मानसिक आरोग्याचे संगोपन करणे अत्यंत आवश्यक बनले आहे. यश आणि अपयश हे मानवी आयुष्याचा अत्यंत अविभाज्य भाग आहेत, ही वस्तुस्थिती लहानपणा पासूनच विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले आहे. मुंबईतील अंजुमन-ए-इस्लाम संचलित सैफ तय्यबजी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे वर्ल्ड मेमन ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएमओ) इंडिया आणि यामा पटेल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष सामाजिक उपक्रमात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.

        ईद-e-मिलादच्या पर्वानिमित्त आयोजित या मानवतावादी कार्यक्रमात गरजू पालकांना जीवनावश्यक अन्नधान्याच्या रेशन किटचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना मंत्री अदिती तटकरे यांनी अंजुमन-ए-इस्लाम संस्थेच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाची प्रशंसा केली. बदलत्या काळाची पावले ओळखून येणाऱ्या तरुण पिढीला दर्जेदार शिक्षण देणे हे आपले मुख्य कर्तव्य असले, तरी मानसिक ताण तणावाखाली वावरणारा विद्यार्थी वर्ग पाहता त्यांच्या मानसिक स्वास्थ्याला बळ देणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. शिक्षण आणि मूलभूत सुविधांच्या प्रसारासाठी सर्व घटकांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.

        कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषवताना अंजुमन-ए-इस्लामचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. झहीर आय. काझी यांनी संस्थेच्या गौरवशाली इतिहासाची माहिती दिली. तब्बल १५२ वर्षांची परंपरा लाभलेल्या या संस्थेने देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामातही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या विचाराला पुढे नेत संस्था सध्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ आणि बेटी बसाओ’ या सर्व समावेशक संकल्पनेवर अत्यंत तळागाळात काम करत असल्याची माहिती त्यांनी दिली. विशेषतः अनाथ मुलींचे शिक्षण, त्यांचा विवाह आणि त्यांच्या सुरक्षित पुनर्वसनाची संपूर्ण जबाबदारी ही संस्था यशस्वीपणे पार पाडत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

         या सामाजिक आणि प्रेरणादायी उपक्रमामुळे परिसरातील अनेक गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून, मानवतेची सेवा आणि उपेक्तांपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्यासाठी अशा उपक्रमांमध्ये सामाजिक संस्थांनी मोठ्या प्रमाणावर पुढाकार घ्यावा, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. या उच्चस्तरीय कार्यक्रमास संस्थेच्या प्राचार्या अमीना काझी, वरिष्ठ उपाध्यक्ष मुश्ताक अंतुले, डब्ल्यूएमओचे अध्यक्ष हाजी हसीन आघाडी, यामा पटेल फाउंडेशनचे प्रतिनिधी, डब्ल्यूएमओ मुंबईचे शहर अध्यक्ष हाजी मुदस्सर पटेल, हाजी इम्तियाज मोटरवाला, नसीन मकलाई, हुरिया पटेल, मुमताज परफ्यूमवाला यांच्यासह अनेक मान्यवर, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या संगोपनावर अदिती तटकरे यांचा भर

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software