पुणे ग्रामीण भागात १,३७२ ‘आपले सरकार’ केंद्रांना मंजुरी; अर्जाची आज अंतिम मुदत

पुणे ग्रामीण भागात १,३७२ नवीन ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांना मंजुरी. अर्ज करण्याची ३१ ऑगस्ट अंतिम मुदत असून २६ ऑक्टोबरला अंतिम निवड यादी जाहीर होईल.

पुणे: ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय दाखले, प्रमाणपत्रे आणि कल्याणकारी योजनांचा लाभ थेट गावातच सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी पुणे जिल्ह्यात ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांचे मोठे जाळे उभारण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागात नव्याने १ हजार ३७२ केंद्रांच्या स्थापनेला मंजुरी दिली असून, या केंद्रांसाठी केंद्रचालक निवडी करिता अर्ज करण्याची आज (३१ ऑगस्ट) अंतिम मुदत आहे. तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर घेतलेल्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची होणारी पायपीट थांबणार असून स्थानिक तरुणांसाठी रोजगाराचे नवे मार्ग खुले झाले आहेत.

         गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागातील लोकसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने गावागावांतून शासकीय व डिजिटल ऑनलाइन सेवांची मागणी कमालीची वाढली होती. जिल्ह्यात यापूर्वी २०२२ मध्ये नवीन केंद्रांसाठी अधिकृत प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानंतर सलग चार वर्षे नवीन केंद्रांना कोणतीही मंजुरी न मिळाल्यामुळे स्थानिक नागरिक व लोक प्रतिनिधीं कडून सातत्याने पाठपुरावा केला जात होता. या सर्व मागण्यांची दखल घेत राज्य शासनाने ग्रामीण भागात १ हजार ३७२ नवीन ‘आपले सरकार’ केंद्रांना अधिकृत हिरवा कंदील दाखवला आहे. प्रत्येक गावात शासकीय सेवा पारदर्शक पद्धतीने उपलब्ध व्हाव्यात आणि स्थानिक बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी मिळावी, या मुख्य उद्देशाने प्रशासनाने यापूर्वीच्या काही किचकट अटी व शर्ती शिथिल केल्या आहेत. विशेष म्हणजे, ही संपूर्ण अर्ज प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आली आहे.

        केंद्रचालकांच्या निवडीसाठी अत्यंत पारदर्शक पद्धत अमलात आणली जाणार असून यासाठी १०० गुणांचे मूल्यमापन निश्चित करण्यात आले आहे. या मूल्यमापनामध्ये उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, संगणक व डिजिटल साक्षरता, कार्यालयासाठी उपलब्ध पायाभूत सुविधा, आर्थिक क्षमता, पूर्वानुभव, व्यवसाय आराखडा, स्थानिक उद्योजकता आणि चारित्र्य पडताळणी या प्रमुख निकषांचा समावेश आहे. या निकषांच्या आधारे होणाऱ्या मुलाखतीनंतर सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या पात्र उमेदवारांना केंद्रांचे अधिकृत वाटप केले जाईल. ग्रामीण भागातील ही निवड प्रक्रिया सुरळीत पार पडल्यानंतर आगामी काळात पुणे शहरातील ‘आपले सरकार’ केंद्रांसाठी स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

     या संपूर्ण निवड प्रक्रियेचे तपशीलवार वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, त्यानुसार ३१ ऑगस्ट रोजी अर्ज स्वीकारण्याची मुदत संपत आहे. त्यानंतर १ ते ११ सप्टेंबर या कालावधीत प्राप्त अर्जांची छाननी केली जाईल, तर १५ ते २४ सप्टेंबर दरम्यान पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील. या प्रक्रियेनंतर ५ ऑक्टोबर रोजी प्राथमिक निवड यादी प्रसिद्ध केली जाईल. या यादीवर ५ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत नागरिकांना व उमेदवारांना आपल्या हरकती व सूचना नोंदवता येणार आहेत. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आगामी २६ ऑक्टोबर रोजी अंतिम निवड यादी जाहीर केली जाणार असून, या प्रक्रियेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना घरपोहोच शासकीय सेवा मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

 

 

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

पुणेकरांची कार्यालयीन धावपळ थांबणार; बांधकाम परवानगीसोबत ‘एनए’ मंजुरी

Latest News

पुणेकरांची कार्यालयीन धावपळ थांबणार; बांधकाम परवानगीसोबत ‘एनए’ मंजुरी पुणेकरांची कार्यालयीन धावपळ थांबणार; बांधकाम परवानगीसोबत ‘एनए’ मंजुरी
पुणे महापालिकेकडून अकृषिक रूपांतरण (NA) प्रक्रियेत मोठा दिलासा. बांधकाम परवानगीसोबतच आता मिळणार 'एनए' मंजुरी, जिल्हाधिकारी कार्यालयातील फेऱ्या संपल्या.
चाकण मधील कोंडी आणि खड्ड्यांवर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; ३१ ऑगस्ट नंतर कामांना वेग
पुणे ग्रामीण भागात १,३७२ ‘आपले सरकार’ केंद्रांना मंजुरी; अर्जाची आज अंतिम मुदत
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, १० प्रवासी गंभीर जखमी
मोहन भागवतांचा टोरंटो मध्ये संदेश; ‘हिंदू जागा झाला तर संपूर्ण जग जागे होईल’

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software