गणेशोत्सवात प्लाझ्मा साउंड-लेझरवर बंदी; पुणे ग्रामीण पोलिसांचा कडक इशारा

गणेशोत्सवात प्लाझ्मा साउंड व लेझर लाईट्सवर बंदी. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांचा नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा कडक इशारा.

पुणे: आगामी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी ध्वनीप्रदूषण, कायदा व सुव्यवस्था आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. ग्रामीण भागातही आता ध्वनी क्षेपकांच्या डेसिबल मर्यादेचे काटेकोर पालन करणे बंधनकारक करण्यात आले असून, ‘प्लाझ्मा साउंड’ आणि डोळ्यांना घातक ठरणारे प्रखर लेझर झोत यांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा सज्जड इशारा पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी दिला आहे.

       पुणे जिल्हा मुख्यालयात आयोजित जिल्ह्यातील प्रमुख १५० गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या विशेष बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक शुभम कुमार, गणेश बिरादार यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय, महावितरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुणे जिल्ह्यात सध्या सुमारे ५,३०० हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सक्रिय असून, आगामी उत्सवात अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. गणेशोत्सवा दरम्यान ध्वनि क्षेपकांचा वापर निश्चित केला जाऊ शकतो, परंतु प्रशासनाने ठरवून दिलेल्या डेसिबल मर्यादेचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

       उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ग्रामीण भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. नसरापूर तसेच जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी परिसरात घडलेल्या भूतकाळातील घटनांच्या पार्श्वभूमीवर मंडळांच्या कार्यकर्त्यांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. गर्दीच्या काळात अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि सुरक्षेवर बारीक नजर ठेवण्यासाठी पोलिसांनी एक महत्त्वपूर्ण उपाय सुचवला आहे. ग्रामीण भागात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची असलेली कमतरता लक्षात घेता, गणेश मंडळांनी वर्गणीतून जमा होणाऱ्या निधीचा काही भाग गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी वापरावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या कॅमेऱ्यांमुळे उत्सव काळातील गर्दीवर नियंत्रण ठेवणे आणि गुन्हेगारी कृत्यांना आळा घालणे सोपे जाईल, असे पोलिसांनी नमूद केले असून, यंदाचा गणेशोत्सव शिस्तबद्ध, पर्यावरणपूरक आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या संगोपनावर अदिती तटकरे यांचा भर

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software