भारतीय संस्कृती आणि भाषांचे वेगळेपण जगासमोर मांडण्याची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

घाटकोपरमधील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलींच्या खात्यात प्रत्येकी २० हजार जमा.

मुंबई: भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन आणि सर्वसमावेशक संस्कृती आहे. पाश्चात्त्य विचारसरणीपेक्षा भारतीय भाषांचे वेगळेपण आणि तिचे वेगळेपण जगासमोर ठळकपणे मांडण्याची आज मोठी गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. घाटकोपर येथील एसपीआरजे कन्याशाळेत आयोजित ‘सुकन्या समृद्धी योजने’अंतर्गत बालिकांच्या आर्थिक सक्षमीकरण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी आमदार प्रसाद लाड, आमदार राम कदम, गौरव भंडारी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिक्षणतज्ज्ञ, बँकांचे प्रतिनिधी, विद्यार्थिनी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारतीय संस्कृतीने नेहमीच सभ्य, सुसंस्कृत आणि समताधिष्ठित समाजव्यवस्थेचा पुरस्कार केला आहे. समाजातील प्रत्येक घटकाला, विशेषतः मुलींना शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी शाळा उभारण्याची आणि ज्ञानाची दारे सर्वांसाठी खुली करण्याची आपली मोठी परंपरा आहे. पाश्चात्य विचारसरणी स्पर्धा आणि सामर्थ्याला प्राधान्य देते, तर भारतीय संस्कृती प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा आणि प्रगतीचा समान अधिकार मानते, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या मोहिमेद्वारे महिला शिक्षण आणि सक्षमीकरणाला राष्ट्रीय चळवळीचे स्वरूप दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. जगातील ज्या राष्ट्रांनी महिलांना शिक्षण, कौशल्य आणि समान संधी दिली, तीच राष्ट्रे आज प्रगतीच्या शिखरावर पोहोचली आहेत. मुलींचे संरक्षण, शिक्षण आणि आर्थिक सक्षमीकरण ही केवळ शासनाची नव्हे, तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

मुलींच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षेसाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजना अत्यंत प्रभावी ठरत आहेत. या विशेष सामाजिक उपक्रमाअंतर्गत तब्बल एक हजार मुलींच्या खात्यांमध्ये प्रत्येकी २० हजार रुपये जमा करण्यात आले असून, पुढील दहा वर्षे दरवर्षी तेवढीच रक्कम जमा केली जाणार आहे. यादरम्यान दहा वर्षांवरील मुलींसाठी ‘एनपीएस वात्सल्य योजना’ आणि दहा वर्षांवरील मुलींसाठी ‘सुकन्या समृद्धी योजना’ अंतर्गत नोंदणी करण्यात आली. कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशांचे वितरण करण्यात आले. समाजातील सक्षम घटकांनी दुर्बलांसाठी संधी आणि आधारव्यवस्था निर्माण करणे हीच खरी भारतीय संस्कृती असल्याचे सांगत, मुख्यमंत्री फडणवीस यांनी या उपक्रमाचे आणि गौरव भंडारी यांच्या सामाजिक बांधिलकीचे भरभरून कौतुक केले.

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे भव्य स्मारक वंचितांच्या संघर्षाचे प्रेरणास्थान – मुख्यमंत्री फडणवीस

Latest News

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे भव्य स्मारक वंचितांच्या संघर्षाचे प्रेरणास्थान – मुख्यमंत्री फडणवीस लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे भव्य स्मारक वंचितांच्या संघर्षाचे प्रेरणास्थान – मुख्यमंत्री फडणवीस
घाटकोपर येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकाचे भूमिपूजन. ३०० कोटींची तरतूद, जुलै २०२९ पर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य.
शिरोळ तालुक्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करणार: मंत्री प्रकाश आबिटकर
भारतीय संस्कृती आणि भाषांचे वेगळेपण जगासमोर मांडण्याची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नेपाळ हिंदू राष्ट्र झाल्यास राजेशाही परत येईल; पंतप्रधान बालेन शाह यांची भीती
मिरा-भाईंदरमध्ये लाखो नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; पाणी शुद्धीकरणासाठी मुदतबाह्य केमिकल वापरल्याचा गंभीर आरोप

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software