शिरोळ तालुक्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करणार: मंत्री प्रकाश आबिटकर

शिरोळ तालुक्यातील दत्तवाड ग्रामीण रुग्णालय ५० खाटांचे होणार, कुरुंदवाडमध्ये महिला रुग्णालय. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आदेश.

मुंबई: कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका आणि परिसरातील आरोग्य सुविधा अधिक बळकट आणि सर्वसमावेशक करण्यात येणार आहेत. दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन, शिरोळ ग्रामीण रुग्णालयासाठी नवीन प्रशस्त इमारत, कुरुंदवाड येथे महिला रुग्णालय, तसेच नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे व आरोग्य उपकेंद्रांच्या उभारणीसंदर्भातील प्रस्तावांना गती देण्यात येणार असल्याची महत्त्वाची घोषणा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली आहे.

मुंबईतील आरोग्य भवन येथील कार्यालयात शिरोळ तालुक्यातील विविध आरोग्यविषयक प्रस्तावांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, अतिरिक्त आयुक्त जगन्नाथ विरकर, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, सहसंचालक सुनिता गोलाईत यांच्यासह कोल्हापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे (ऑनलाइन) उपस्थित होते.

बैठकीत बोलताना सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, ग्रामीण भागातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन आरोग्य पायाभूत सुविधांचा विस्तार करणे अत्यंत गरजेचे आहे. दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून सध्या सुरू असलेल्या ३० खाटांच्या रुग्णालयाला ५० खाटांच्या रुग्णालयात रूपांतरित करण्यात येणार आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना अधिक व्यापक, दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्यसेवा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असून, त्यासंबंधित बांधकामाचे प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

शिरोळ तालुक्यातील आरोग्य जाळे अधिक मजबूत करण्यासाठी बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यानुसार:

  • संभाजीपूर आणि टाकवलीवाडी येथील नवीन आरोग्य उपकेंद्रांच्या प्रस्तावांना गती देण्याचे आदेश देण्यात आले.
  • यड्राव येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे.
  • तसेच लाटवाडी, शिवनाकवाडी, तेरवाड, आगर, कनवाड, खिद्रापूर, बस्तवाड, तामदलगे आणि जैनापूर या गावांमध्ये नवीन आरोग्य उपकेंद्र सुरू करण्याच्या प्रस्तावांवर वेगाने काम सुरू आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या घराच्या जवळच गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे हे राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. शिरोळ तालुक्यातील सर्व प्रलंबित आरोग्यविषयक प्रस्तावांना गती देऊन आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी प्रशासकीय स्तरावर आवश्यक ती सर्व कार्यवाही प्राधान्याने पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही मंत्री आबिटकर यांनी दिली. सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या आणि उपचारांच्या दृष्टीने शासनाकडून निधी वा यंत्रणेमध्ये कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे भव्य स्मारक वंचितांच्या संघर्षाचे प्रेरणास्थान – मुख्यमंत्री फडणवीस

Latest News

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे भव्य स्मारक वंचितांच्या संघर्षाचे प्रेरणास्थान – मुख्यमंत्री फडणवीस लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे भव्य स्मारक वंचितांच्या संघर्षाचे प्रेरणास्थान – मुख्यमंत्री फडणवीस
घाटकोपर येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकाचे भूमिपूजन. ३०० कोटींची तरतूद, जुलै २०२९ पर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य.
शिरोळ तालुक्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करणार: मंत्री प्रकाश आबिटकर
भारतीय संस्कृती आणि भाषांचे वेगळेपण जगासमोर मांडण्याची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नेपाळ हिंदू राष्ट्र झाल्यास राजेशाही परत येईल; पंतप्रधान बालेन शाह यांची भीती
मिरा-भाईंदरमध्ये लाखो नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; पाणी शुद्धीकरणासाठी मुदतबाह्य केमिकल वापरल्याचा गंभीर आरोप

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software