- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- महाराष्ट्रात ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद निवडणुकांचे संकेत; डिसेंबर २०२६ मध्ये होण्याची शक्यता
महाराष्ट्रात ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद निवडणुकांचे संकेत; डिसेंबर २०२६ मध्ये होण्याची शक्यता
महाराष्ट्रात १२ हजार ग्रामपंचायती व २० जिल्हा परिषदांच्या निवडणुका डिसेंबर २०२६ मध्ये होण्याची शक्यता. ५०% आरक्षण मर्यादेमुळे राजकीय समीकरणांत बदल.
मुंबई: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा होण्याची चिन्हे दिसत आहेत. ओबीसी आरक्षण, विशेष मतदार यादी पडताळणी (SIR) आणि विविध न्यायालयीन प्रक्रियेमुळे लांबणीवर पडलेल्या निवडणुकांचा बिगुल लवकरच वाजणार आहे. या वर्षअखेरीस (डिसेंबर २०२६) किंवा जानेवारी २०२७ च्या सुमारास राज्यातील सुमारे १२ हजार ग्रामपंचायती, २० जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि मुदत संपलेल्या १०५ नगरपंचायतींच्या निवडणुका होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
निवडणुकीची तयारी आणि न्यायालयाची भूमिका:
राज्य निवडणूक आयोगाची ऑक्टोबर महिन्यात पूर्ण होणारी विशेष मतदारयादी पडताळणी (SIR) मोहीम संपताच निवडणुकीची प्रशासकीय प्रक्रिया वेगाने सुरू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणुकांसाठी हिरवा कंदील मिळाल्यानंतर आणि राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात ५० टक्क्यांच्या घटनात्मक आरक्षण मर्यादेचे पालन करून निवडणुका घेण्याची तयारी दर्शवल्यामुळे डिसेंबर २०२६ मध्ये जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक संस्थांच्या निवडणुका घेण्याचे मार्ग सुकर झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आतापासूनच जोरदार तयारीला सुरुवात केली असून इच्छुक उमेदवारांची धावपळ उडाली आहे.
ओबीसी आरक्षणावर आणि समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता:
सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या ५० टक्के आरक्षण मर्यादेमुळे आगामी निवडणुकांमध्ये अनेक जिल्ह्यांतील आरक्षणाच्या गणितात मोठे बदल होणे अपेक्षित आहे. उदाहरणार्थ, नागपूर जिल्हा परिषदेचा विचार केल्यास, पूर्वी ५७ पैकी ३३ जागा आरक्षित होत्या (ज्यात ओबीसींसाठी १५, एससीसाठी १० आणि एसटीसाठी ८ जागा होत्या). मात्र, ५० टक्क्यांच्या मर्यादेचे काटेकोर पालन करताना एकूण आरक्षित जागा ३३ वरून २७ पर्यंत खाली येऊ शकतात. याचा सर्वाधिक परिणाम ओबीसी आरक्षणावर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून, ओबीसीं साठीच्या १५ जागा कमी होऊन त्या १० वर येऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
आरक्षणातील या संभाव्य बदलांमुळे अनेक ग्रामीण मतदार संघांतील राजकीय गणिते आणि आजी-माजी नेत्यांची समीकरणे पूर्णपणे बदलू शकतात. ग्रामपंचायतींपासून ते थेट जिल्हा परिषदांपर्यंत होणाऱ्या या निवडणुकीमुळे महाराष्ट्राचे ग्रामीण आणि स्थानिक राजकारण पुन्हा एकदा चांगलेच तापणार असून, राज्य निवडणूक आयोगाकडून अधिकृत निवडणूक कार्यक्रम आणि अंतिम आरक्षण आराखडा जाहीर झाल्यानंतर चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल.
