- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे भव्य स्मारक वंचितांच्या संघर्षाचे प्रेरणास्थान – मुख्यमंत्री फडणवीस
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे भव्य स्मारक वंचितांच्या संघर्षाचे प्रेरणास्थान – मुख्यमंत्री फडणवीस
घाटकोपर येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकाचे भूमिपूजन. ३०० कोटींची तरतूद, जुलै २०२९ पर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य.
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य, विचार आणि सामाजिक कार्य हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून संपूर्ण जगाला प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या चिरागनगर या कर्मभूमीत उभारण्यात येणारे ‘लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था’ आणि भव्य स्मारक हे केवळ एक वास्तू नसून वंचित, कष्टकरी आणि उपेक्षित समाजाच्या संघर्षाचे, स्वाभिमानाचे आणि सामाजिक परिवर्तनाचे जिवंत प्रतीक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. घाटकोपर येथील चिरागनगर येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) आणि बृहन्मुंबई यांच्या वतीने आयोजित लोकशाहीर अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आणि स्मारकाच्या पहिल्या टप्प्याच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते.
या ऐतिहासिक कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मुंबईच्या महापौर रितू तावडे, खासदार संजय दिना पाटील, आमदार राम कदम, अमित गोरखे, प्रसाद लाड, अमित साटम यांच्यासह अण्णा भाऊ साठे यांच्या स्नुषा श्रीमती सावित्रीबाई साठे, नात ज्योती साठे, नातू सचिन साठे आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या या महत्त्वाकांक्षी स्मारकाचा निर्णय २०१६ मध्ये घेण्यात आला होता. हा प्रकल्प खासगी विकासकांकडून उभारण्याऐवजी एसआरएसह शासनाकडून पारदर्शक व गतिमान पद्धतीने पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्मारक उभारताना परिसरातील नागरिकांच्या पुनर्वसनाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून, कोणालाही बेघर न करता पात्र व अपात्र प्रत्येक नागरिकाला योग्य घर उपलब्ध करून दिले जात आहे. स्मारकाचे काम जुलै २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, त्यानंतर त्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पुण्यात उभारण्यात येणाऱ्या क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या स्मारकाचे ६५ टक्के काम पूर्ण झाले असून त्याचेही लवकरच लोकार्पण केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अण्णा भाऊ साठे यांनी आपले संपूर्ण आयुष्य वंचित आणि शोषित घटकांसाठी समर्पित केले. त्यांच्या विचारांचा जगभरात प्रसार करण्यासाठी चिरागनगर येथे उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी शासनाने सुमारे ३०० कोटी रुपयांची तरतूद केली असून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. अण्णा भाऊंच्या मूळ गावी वाटेगाव येथेही ५० कोटी रुपयांच्या खर्चातून स्वतंत्र स्मारक उभारण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले की, ‘बार्टी’च्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेली ‘आर्टी’ (AARTI) संस्था शिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या माध्यमातून मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना देईल. कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘पारदर्शकतेतून परिवर्तनांकडे’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. तसेच यूपीएससी परीक्षेत यश मिळवलेली प्रेरणा कैलास खवले आणि अण्णा भाऊ साठे यांच्या कुटुंबियांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी केले, तर आभार सचिव दत्तात्रय नवले यांनी मानले.
