- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- बारामतीत थरार! बँक ऑफ इंडियाचे एटीएम कटरने फोडून १४.१९ लाखांची रोकड लंपास; सीसीटीव्हीच्या आधारे पोलि...
बारामतीत थरार! बँक ऑफ इंडियाचे एटीएम कटरने फोडून १४.१९ लाखांची रोकड लंपास; सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांचा शोध सुरू
बारामती तालुक्यातील पणदरे येथे बँक ऑफ इंडियाचे एटीएम कटरने फोडून १४ लाख १९ हजार १०० रुपयांची चोरी. माळेगाव पोलिसांकडून तपास सुरू.
बारामती: पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातून एक मोठी आणि खळबळजनक घटना समोर आलीआहे. बारामती तालुक्यातील पणदरे गावात अज्ञात चोरट्यांनी अतिशय चलाखीने आणि धाडसाने बँक ऑफ इंडियाच्या (Bank of India) एटीएम केंद्राला लक्ष करत कटरच्या साह्याने एटीएम मशीन फोडले. या थरारक चोरीमध्ये चोरट्यांनी मशीनमधील तब्बल १४ लाख १९ हजार १०० रुपयांची रोकड लंपास केली आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागातील एटीएम केंद्रांच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पणदरे गावातील या एटीएम केंद्रात पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. अत्यंत आधुनिक कटर आणि हत्यारांच्या मदतीने चोरट्यांनी एटीएम मशीनचे लोखंडी कव्हर कापून मशीन फोडली. या एकाच ठिकाणच्या केंद्रात असलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या दोन मशीनना चोरट्यांनी टार्गेट केले.
पहिली ‘पेट्रो कंपनी’ची एटीएम मशीन फोडून त्यातून तब्बल ११ लाख ९२ हजार ७०० रुपयांची रोकड लांबवण्यात आली. यामध्ये १०० रुपयांच्या १४१७ नोटा, २०० रुपयांच्या १५९० नोटा आणि ५०० रुपयांच्या १४६६ नोटांचा समावेश होता. याच ठिकाणी असलेल्या ‘हिताची कंपनी’च्या दुसऱ्या मशीनमधूनही २ लाख २६ हजार ४०० रुपयांची रक्कम चोरण्यात आली. अशा प्रकारे दोन्ही मशीनमधून एकूण १४ लाख १९ हजार १०० रुपयांची रोकड लंपास करण्यात आली असून, चोरट्यांनी मशीन आणि सीडीएम (CDM) मशीनची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करत नुकसान केले आहे.
सकाळी ही चोरी उघडकीस आल्यानंतर बँक प्रशासनाचे धाबे दणाणले आणि त्यांनी तात्काळ माळेगाव पोलीस ठाण्याला याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन माळेगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलीस आता परिसरातील सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage), तांत्रिक पुरावे आणि इतर साधनांची कसून तपासणी करत आहेत.
चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली असून, लवकरात लवकर या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात येतील, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, ग्रामीण भागातील वर्दळीच्या किंवा इतर ठिकाणच्या एटीएम केंद्रांवर सुरक्षारक्षकांची अनुपस्थिती आणि वाढत्या चोऱ्यांमुळे सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
